Ramesh Adaskar sarkarnama
मराठवाडा

माजलगावमधून भाजपकडून मीच लढणार : आडसकरांचे सोळंकेंसह देशमुखांनाही आव्हान

आडसकरांना निकटचा पराभव स्विकारावा लागला.

सरकारनामा ब्यूरो

बीड : आता येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, माझी निवडणूक दूर आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माझी निवडणूक आहे, असे सांगत भाजप नेते रमेश आडसकर (Ramesh Adskar) यांनी २०२४ ला माजलगावमधून विधानसभेची निवडणूक लढणारच असल्याचा षटकार ठोकून दिला. आर. टी. देशमुखही (R. T. Deshmukh) पुन्हा फिरायला लागलेत मात्र, आपणच लढणार म्हणत त्यांनी पुढची दिशा स्पष्ट केली.

माजलगाव मतदार संघातील वडवणी येथे आयोजित प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धांच्या निमित्ताने ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, नितीन नाईकनवरे, महाविर मस्के, बाबरी मुंडे आदींची उपस्थिती होती. २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन भाजप आमदार आर. टी. देशमुख यांच्या ऐवजी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना तयारीसाठी उणे -पुरे १४ दिवस मिळाले.

त्यात भाजपच्या काही धुरीणांनी राष्ट्रवादीशी अंधारातून हात मिळवणी केली आणि आडसकरांना निकटचा पराभव स्विकारावा लागला. सध्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आमदार असून त्यांच्या अधिपत्याखाली साखर कारखाना, बाजार समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. राष्ट्रवादी या ठिकाणी प्रबळ मानली जाते. त्यामुळे पराभवानंतर आडसकर पुन्हा लढण्याची हिंमत करणार का, अशी चर्चा असतानाच आडसकरांनी आताच २०२४ ची घोषणा करुन टाकली आहे.

पक्षांतर्गत स्पर्धकांनाही त्यांनी या निमित्ताने आपण कच खाल्ली नसल्याचा मेसेज देऊन टाकला आहे. आपण केवळ एकदाच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतो. त्याच बळावर लोकांची कामे केली आणि लोकांनीही भरभरुन प्रेम दिल्याचे आडसकर म्हणाले. आता येणाऱ्या नगर पालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. मात्र, कार्यकर्त्यांसाठी आपण सक्षम ताकदीने उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला. २०१९ पर्यंत भाजपच्या सत्तेच्या काळात या भागात विकासासाठी मोठा निधी मिळाला. मात्र, आताचे सत्ताधारी जुन्या निधीतील कामांचीच उद्घाटने करत असल्याचा टोलाही आडसकर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT