Jalna Lok Sabha 2024 Result Analysis: Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve: लावू का अण्णांना फोन! रावसाहेब दानवेंना विरोधकांनी दाखवला आरसा

सरकारनामा ब्यूरो

कैलास दांडगे

पारध : लोकसभेच्या जालना मतदारसंघात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव झाला आणि विरोधकांनी त्यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही.

काही दिवसांपुर्वी भोकरदन शहरात युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने लावलेले स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, बॅनरची चर्चा थांबत नाही तोच तालुक्यातील पारध येथील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी बसस्थानकावर "आता लावू का अण्णाला फोन" असे बॅनर लावून रावसाहेब दानवे यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हे तालुक्यात अण्णा या टोपण नावाने परिचित आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांचा पराभव केला होता.

अवघ्या 1639 मतांनी भाजपचा या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या पराभवामुळे दानवे यांचा चंद्रकांत दानवे आणि त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते व लीड देणाऱ्या गावांवर विशेष राग होता.

त्यानंतर जेव्हा केव्हा चंद्रकांत दानवे (Chandrakant Danve) यांचे समर्थक कुठल्याही कामासाठी खासदार, मंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांच्याकडे गेले, तर तेव्हा तेव्हा त्यांना रावसाहेब दानवे त्यांना अण्णांकडे म्हणजेच चंद्रकांत दानवे यांच्याकडे जाण्याचा खोचक सल्ला द्यायचे.

याची आठवण चंद्रकांत दानवे यांच्या समर्थकांनी ठेवली आणि त्यातून पारधमध्ये महाविकास आघाडीच्या डॉ. कल्याण काळे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावू का अण्णांना फोन असे रावसाहेब दानवे यांना डिवचणारे पोस्टर लावले आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून या मतदार संघावर सत्ता असलेले रावसाहेब दानवे यांना जनतेने यावेळी मात्र चकवा दिला. मतदारसंघात त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. जालन्याप्रमाणे भोकरदन तालुका हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या चाळीस वर्षांपासून रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व इथे राहिले आहे. त्यामुळे तालुक्यातील त्यांच्या शब्दाला प्रशासनात विशेष असा मान होता.

त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास झाला, असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. भाजपच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व चंद्रकांत दानवे समर्थक स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना मोठा त्रास झाला, असेही सांगितले जाते.

यावेळी मतदारांनी रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्यानंतर आता विरोधकांकडून भाजपला बॅनरबाजीच्या माध्यमातून आरसा दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. डॉ. कल्याण काळे यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच बॅनरच्या माध्यमातून आपला रोष अशा पद्धतीने विरोधक व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT