Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : '25 वर्ष पुढे नेणाऱ्या मतदारांनी थांबवले, त्यांना दोष कसा देणार...', पराभवावर रावसाहेब दानवेंची भावना

Jagdish Pansare

Raosaheb Danve News : राजकारणात सतत पराभव पाहणारा आणि कधी तरी जिंकणारा जय-पराजयाने खचतो. मी दहा वर्ष आमदार, पंचवीस वर्ष खासदार होतो. फारशी प्रतिभा नव्हती, एका सामान्य कुटुंबातून आलो आणि मतदार मला पुढे नेत गेले. त्यामुळे एका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या मतदारांना दोष द्यायचा का? जर तो दिला तर मग त्यांनी मला पंचवीस वर्ष निवडून दिले त्याचे काय? त्यामुळे मी मतदारांना कधीही दोष देणार नाही, तो देता येणार नाही, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

हा पराभव विरोधकांनी नाही तर जनतेने केला. ज्यांनी मला राजकारणात पुढे नेलं त्यांनीच आता थांबायला सांगितलं, असा मी त्याचा अर्थ घेतो. एका पराजयाने घरात बसण्याऱ्यापैकी मी नाही. पुन्हा मतदारांच्या दारात जाईन, असे देखील दानवे म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पराभवाची कारणे, भविष्यातील राजकारण, आगामी विधानभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती अशा विविध विषयावर दानवे यांनी आपली मते मांडली.

जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आल्यानंतर सहाव्यांदा त्यांचा पराभव झाला. हा पराभव विरोधकांनी नाही तर जनतेने केला. ज्या मतदारांनी मला सातत्याने निवडून दिलं, आमदार, खासदार, मंत्री केलं, त्यांना जर असं वाटलं असेल की आता रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांना थांबवाव आणि त्यांनी थांबवल तर त्यांच्या मताची मी आदरच करतो. एका पराभवाने खचून जाणाऱ्यांपैकी मी नाही, असे दानवे यांनी ठणकावले.

...तसे विधानसभेला घडणार नाही

पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी मतदारांच्या आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी बाहेर पडलो. मराठवाड्याचा दौरा केला, लोकसभेच्या Lok sabha पराभवाबद्दल मत जाणून घेतली. विधानसभेत काय घडू शकते याचा अंदाज घेतला. यावरून एवढे मात्र नक्की सांगू शकतो की जे लोकसभेला घडले ते विधानसभेला घडणार नाही, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला.

विरोधक आनंदी कसे?

देशात आम्हाला अपेक्षेप्रमाणे 400 जागा मिळाल्या नाही. पण जे विरोधक इंडिया आघाडीवाले आनंद व्यक्त करत आहेत, त्या सगळ्या पक्षाच्या मिळून जितक्या जागा आल्या नाही तितक्या 240 एकट्या भाजपच्या आल्या. मित्रपक्षांच्या सोबतीने आम्ही सत्तेवर आलो. मग हे कशाचा आनंद साजरा करतात? असा टोलाही दानवे यांनी लगावला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT