जालना : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (ता. २३ ऑक्टोबर) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना आसूड दिला, त्यावेळी त्यांनी हा आसूड सत्ताधाऱ्यांवर चालवला पाहिजे, असे विधान केले होते. त्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी ‘पहिला आसूड हा उद्धव ठाकरेंवरच चालवला पाहिजे; कारण त्यांनी राज्याची अडीच वर्षे वाया घालवली आहेत’, अशा शब्दांत उत्तर दिले आहे. (Raosaheb Danve's reply to Uddhav Thackeray's criticism)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही धीर सोडून नका; आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, अशा शब्दांत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी शेतकऱ्यांनी त्यांना सत्ताधाऱ्यांवर ओढण्यासाठी आसूड भेट दिला. त्यावेळी त्यांनी योग्यवेळी हा आसूड तुम्हीच चालवा, असे आवाहन केले. त्याला दानवे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडले आहेत. राज्यात काही ठिकाणी ते दौरे करत आहेत. याचे क्रेडीट त्यांना स्वतःला जात नाही. त्याचं क्रेडीट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जातं. कारण अडीच वर्षे उद्धव ठाकरे हे ना मंत्रालयात गेले ना राज्यात फिरले. त्यांनी अडीच वर्षे घरी बसून कारभार केला. राजा जोपर्यंत जनतेत जाणार नाही; तोपर्यंत जनतेची दुःखं त्याला कळणार नाहीत. हे आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितले, पण ते घराच्या बाहेर पडले नाहीत. आपलं कुटुंब आणि आपली जबाबदारी एवढंच काम त्यांनी केले.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ४० आमदार आपल्यासोबत नेले, तेव्हा उद्वव ठाकरे यांच्या लक्षात आलं की जनतेत गेल्याशिवाय जनसमर्थन मिळत नाही, जसं एकनाथ शिंदेंना मिळालं, त्यामुळे ठाकरे हे आता जनतेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून किती ठिकाणी ते जातील, हे सांगता येत नाही. पण ते जनतेत मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चांगलं लक्षण आहे. एक विरोधी पक्षातील माणूस जनतेत जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतो, हे महत्वाचे आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद दौऱ्यात शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना आसूड दिला. तो आसूड विरोधकांवर चालविण्याचे विधान त्यांनी केले आहे. पण, मला असं वाटतंय की पहिला आसूड हा उद्धव ठाकरेंवर चालवला पाहिजे. कारण त्यांनी राज्याची अडीच वर्षे वाया घालवली आहेत. कुठलीही योजना आणि जनतेच्या हिताचे प्रश्न ठाकरेंनी सोडविले नाहीत, त्यामुळे पहिला आसूड ठाकरे यांच्यावर ओढला पाहिजे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अशी भाषा वापरली पाहिजे, असे आवाहनही दानवे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.