Nanded Mahayuti Political News : लोकसभा निवडणुकीत दारुण झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून महायुती अद्याप सावरलेली नाही. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाण, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्कर पाटील खतगांवकर आणि मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी सोबत असूनही महायुतीला पराभवाची धूळ चाखावी लागली. काँग्रेस महाविकास आघाडीने साठ हजार मताधिक्याने नांदेडची जागा जिंकत काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण हा भ्रम दूर केला. निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पारंपारिक मतदारांनी पक्ष बदलणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यासह चिखलीकरांना चांगलाच झटका दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधात असलेल्या वातावरणामुळे महायुतीचे नेते नांदेड (Nanded) जिल्ह्यात निष्प्रभ ठरले. लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाले तरी राज्यात महायुतीला पोषक असे वातावरण दिसत नाही. `मुख्यमंत्री लाडकी बहीण` सारख्या योजना राबवून सरकारने मोठ्या प्रमाणात महिला मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीला याचा कितपत फायदा होतो हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर अशोक चव्हाण आपली मुलगी श्रीजया हिला आमदार करण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत.
तर दुसरीकडे लोकसभेला पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा लोहा-कंधार मधून लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होण्याची शक्यता आहे. चिखलीकर लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही डगरीवर हात ठेवून आहेत. ज्या मराठा फॅक्टरने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात फॅक्चर केले, तो प्रश्न विधानसभा निवडणुकीतही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू करत सरकारला दररोज इशारे देणे सुरू केले आहे. अशावेळी महायुतीचे जिल्ह्यातील नेते पक्षापेक्षा आपापल्या राजकीय स्वार्थाला अधिक महत्व देत असल्याचे चित्र आहे. (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी मध्यंतरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दौरे करत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, पण त्यांचा जीव भोकर मतदारसंघात अडकला आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री भास्कर पाटील खतगांवकर यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मेहुण्यांना थोपवण्यातही अशोक चव्हाण यांची बरीच शक्ती खर्ची पडत आहे. या सगळ्या आघाडीवर नांदेड जिल्ह्यात भाजप गेल्यावेळी जिंकलेल्या नायगाव, मुखेड च्या जागा तरी राखते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भोकरची जागा रिक्त आहे.
तर नायगाव- राजेश पवार, तर डाॅ. तुषार राठोड-मुखेड या दोन जागा सध्या भाजपकडे आहेत. तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडे नांदेड उत्तर-बालाजी कल्याणकर यांच ऐकमेव जागा आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. महायुतीला याचा किती फायदा होतो हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे हे पक्षासोबतच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन पैकी दोन आमदार आता भाजपमध्ये आहेत. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेना-भाजप या पक्षांचे बलाबल समान होते. पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलते का ? यावर अशोक चव्हाण यांचे जिल्ह्यातील वजन सिद्ध होणार आहे.
महाविकास आघाडी मुसंडीच्या तयारीत
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने नांदेडमध्ये मोठा विजय मिळवला होता. शिवाय अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील अनेक नाराज नेते, पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन-अडीच महिन्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यात माजीमंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर यांचा समावेश आहे.
तर ठाकरे गटाने शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या बालाजी कल्याणकर यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे. देगलूर, भोकर, नांदेड दक्षिण या गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी नांदेड जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी नांदेडमध्ये काही मतदारसंघात चमत्कार घडवू शकते.
लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय विधानसभेला कायम राहावा, यासाठी पुढील काही काळात महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या चकरा नांदेड जिल्ह्यात वाढणार आहेत. अशोक चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात दुसऱ्यांदा मात देण्याची संधी महाविकास आघाडी साधणार? की महायुती जिल्ह्यात पुन्हा मुसंडी मारणार? यावर जिल्ह्यातील सुत्रे कोणाच्या हाती राहणार हे स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.