Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency : राष्ट्रवादीत बंडखोरी, अजित पवारांनी सांगूनही सोळुंकेची माघार नाहीच..

सरकारनामा ब्युरो

Ncp : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विक्रम काळे यांच्याविरोधात अखेर बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने विक्रम काळे यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली. या विरोधात प्रदीप सोळुंके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

काळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या सभेत (Ajit Pawar) अजित पवारांनी प्रदीप सोळुंके यांना माघार घेण्यास सांगितले होते. (Marathwada) मात्र उलट आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास आधीच सोळुंके यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ व्हायरल करत अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांनाच माघार घेण्याचे आवाहन केले होते.

राज्यभरात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत असतांना औरंगाबादेत देखील राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. आता सोळुंके यांच्या उमेदवारीचा आघाडीच्या विक्रम काळे यांना किती फटका बसतो? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. विक्रम काळे यांना उमेदवारी देण्याचा पक्षात विचार सुरू असतांनाच प्रदीप सोळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्र पाठवत उमेदवारीवर दावा सांगितला होता.

नेत्याच्याच मुलाला किती दिवस मोठं करायचं, आता भाकरी फिरवली पाहिजे. काळे यांच्या विरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे यावेळी मला उमेदवारी द्या, अशी मागणी सोळुंके यांनी केली होती. मला द्यायची नसेल तर इतर कुणाला उमेदवारी द्या, पण काळेंना नको, अशी भूमिका सोळुंके यांनी घेतली होती. एवढेच नाही, तर अजित पवार यांच्या उपस्थितीत विक्रम काळे यांचा अर्ज दाखल केल्यानंतर देखील सोळुंके यांनी आपला अर्ज भरला होता.

अजित पवारांनी सोळुंके यांना माघार घेण्याचे आवाहन करत ते वरिष्ठांच ऐकतील, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु आज माघारीच्या दिवशी सोळुंके यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत काळे यांना पक्षाची इज्जत वाचवायची असेल तर माघार घ्या, आणि मला पाठिंबा जाहीर करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर ते नाॅटरिचेबल झाले, अखेर त्यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT