EX.Mla Babajani Durani Sarkarnama
मराठवाडा

Pathri Assembly Constituency : `मविआ` च्या उमेदवारी याद्या रखडल्या; बेचैन बाबाजानी दुर्राणींनी अपक्ष अर्ज भरला

Independent Nomination by Babajani Durrani: अजित पवारांनी राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली. तेव्हापासून नाराज असलेल्या बाबाजानी यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सगळ्यांना धक्का दिला. भाजपची पहिली यादी जाहीर होऊन उमेदवार कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या याद्यांचा घोळ अजूनही मिटलेला नाही. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सगळ्याच राजकीय पक्षांना कमी वेळ मिळणार आहे.

महाविकास आघाडीच्या याद्या रखडल्याने आता इच्छुकांचा संयम ढळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत असलेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani) यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. विधान परिषदेवर संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र अजित पवारांकडून त्यांच्या भ्रमनिरास झाला. परभणी जिल्ह्यातून अजित पवारांनी राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली.

तेव्हापासून नाराज असलेल्या बाबाजानी यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली. पाथरी मतदारसंघातून निवडणुक लढवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता, असे बोलले गेले. परंतु महाविकास आघाडीमध्ये पाथरीची जागा काँग्रेसकडे आहे. विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांनाच पक्षाकडून पुन्हा उमेदवारी दिली जाणार हे निश्चित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली.

बाबाजानी दुर्राणी यांनी पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याआधीच बाबाजानी यांनी हे पाऊल उचलल्याने पाथरीमध्ये महाविकास आघाडीत बंड झाले असेच म्हणावे लागेल. (NCP) अर्थात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाबाजानी अर्ज मागे घेतात की कायम ठेवतात? त्यानंतरच बंडखोरीवर शिक्कामोर्तब होईल.

तुर्तास बाबाजानी यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. विशेष म्हणजे अपक्ष अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी बाबाजीनी यांनी अतंरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. 2004 मध्ये बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाथरीमध्ये निवडणुक लढवली होती. शिवसेनेच्या हरिभाऊ लहाने यांचा त्यांनी पराभव करत ही जागा जिंकली होती.

2009 मध्ये पक्षाने बाबाजानी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या मीरा रेंगे यांनी त्यांच्या पराभव करत ही जागा पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणली होती. 2014 मध्ये आघाडी तुटल्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघातून सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांचा अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी पराभव केला होता.

2019 मध्ये मात्र सुरेश वरपुडकर यांनी दुसऱ्यांदा पाथरीत नशीब आजमावले आणि ते विजयी झाले. विनिंग सीट असल्यामुळे सहाजिकच काँग्रेसचा या जागेवर दावा असणार आहे. पण विधान परिषदेवर संधी न मिळाल्यामुळे विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यास उत्सूक असलेल्या बाबाजानी यांनी थेट बंडाचे निशाण फडकावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT