Let.Vinayak Mete News Beed
Let.Vinayak Mete News Beed Sarkarnama
मराठवाडा

Vinayak Mete : मजूरी, मुंबईत भाजी विक्री, रंगकाम ते विधान परिषद सदस्यत्वाचे रेकॉर्ड

Dattatrya Deshmukh

बीड : राजेगाव (ता. केज) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटूंबातील विनायक मेटे यांना परिस्थितीमुळे दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करावी लागली. नंतर मुंबई (भिवंडी) येथे त्यांनी भाजी विक्रीचाही व्यवसाय आणि इमारतींचे रंगकामही करावे लागलेल्या (Vinayak Mete) विनायक मेटे यांनी समाजकारणाबरोबर राजकारणातही स्वतंत्र स्थान निर्माण केले.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप पक्षासोबत राहीलेल्या विनायक मेटे तब्बल पाच वेळा विधान परिषद सदस्य राहीले आहेत. (Beed) सर्वाधिक काळ वरच्या सभागृहाचे सदस्य राहीलेले विनायक मेटे राज्यातील एकमेव आहेत हे विशेष. (Marathwada) कळंब येथे माध्यमिक शिक्षण घेताना त्यांनी पोटापाण्यासाठी इमारतीला रंग देण्याचे काम केले.

शिक्षण सोडून त्यांनी शेतीही केली. नंतर घरच्यांच्या परस्पर त्यांनी पुन्हा नववीला प्रवेश घेतला आणि रोज पाच किलोमिटर अंतर कापत दहावी पूर्ण केली. तारुण्यात त्यांनी मुंबई गाठली व पोटापाण्यासाठी भिवंडी येथे त्यांनी काही काळ भाजी विक्रीचाही व्यवसाय केला. याच काळात त्यांनी दिवंगत किसनराव वरखिंडे यांच्यासोबत मराठा महासंघाचे काम सुरु केले.

१९९४ च्या निवडणुकीत मराठा महासंघ भाजपसोबत होता. राज्यात पहिल्यांदा युतीचे सरकार आले आणि प्रथम विनायक मेटे विधान परिषद सदस्य झाले. याच काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पक्ष स्थापन करुन स्वत:ची वाटचाल सुरु ठेवली. नंतर, त्यांच्यात व दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला.

याच काळात जेष्ठ नेते शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. विनायक मेटे यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. त्यांना राष्ट्रवादीनेही दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली. या काळात त्यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून आपली मराठा आरक्षणाची चळवळ पुढे सुरु ठेवली. राष्ट्रवादीने त्यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपदही दिले.

तत्कालिन आघाडी सरकारमध्ये विनायक मेटे यांच्या शब्दाला वजन होते. मात्र, पुन्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांचे आणि राष्ट्रवादीचे बिनसले आणि २०१४ साली दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून ते भाजपमध्ये आले. यानंतरही भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. नंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्षपदही विनायक मेटे यांच्याकडे होते. दरम्यान, विधान परिषदेच्या सभागृह सदस्यांच्या यादीत पाच वेळा आमदार असलेले विनायक मेटे एकमेव आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT