Aurangabad : महाविकास आघाडीचे विक्रम काळे, भाजप-युतीचे किरण पाटील (Kiran Patil) या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची व त्यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्यांची निवडणुकीच चर्चा झाली. पण ज्या (Marathwada) मराठावाडा शिक्षक संघाच्या सुर्यकांत विश्वासराव यांची राजकीय पक्ष आणि माध्यमांनी देखील साधी दखलही घेतली नाही, त्या सुर्यकांत विश्वासराव यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघात अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवली.
विजयाला गवसणी घालता येणार नसली तरी त्यांनी प्रस्थापीत उमेदवारांना घाम मात्र फोडलाच. राज्यात सत्ता असलेल्या आणि प्रदेशाध्यक्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय सचिव यांनी भाजप (Bjp) उमेदवारासाठी जोर लावून देखील तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तर विश्वासराव यांनी (Ncp) विक्रम काळे यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला.
प्रत्यक्षात मतदान झाल्यानंतर मराठवाडा शिक्षक संघाचे काम माहित असलेल्या अनेकांनी विश्वासराव या निवडणुकीत गेमचेंजर ठरतील असे भाकित केले होते. झालेही तसेच पण विक्रम काळे यांना मात्र त्यांना रोखता आलेले नाही. भाजपचे स्वप्न मात्र विश्वाराव यांच्यामुळे भंगले असेच म्हणावे लागेल. कुठलीही प्रभावी प्रचार यंत्रणा नाही, गाड्या, वाहन नाही, की मतदारांना हात जोडून आवाहन नाही.
तरी देखील विश्वासराव यांनी साडेतेरा हजार मतांपर्यंत मजल मारली. शिक्षक मतदारसंघात राजकीय व्यक्ती नको, अशी भूमिका घेत मराठवाडा शिक्षक संघाने सुर्यकांत विश्वासराव यांना मैदानात उतरवले होते. महाविकास आघाडी- भाजप, प्रहार, वंचित आणि बंडखोरांच्या भाऊगर्दीत विश्वासराव यांच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. पण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये असलेली कार्यकर्त्यांची फळी या जोरावर विश्वावसराव यांनी मते मिळवली.
सूर्यकांत विश्वासराव यांचा जन्म १ जून १९६४ रोजी कंधार तालुक्यातील धर्मापुरी येथे झाला. १९८८ पासून त्यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरळा येथील शाळेत शिक्षकी पत्करली. शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशी ३५ वर्षे सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले. विश्वासराव हे २००३ ते २००८ या काळात मराठवाडा शिक्षक संघाचे कंधार तालुकाध्यक्ष, २००८ ते २०२२ या काळात नांदेड जिल्हाध्यक्ष आणि २०२२ मध्ये त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले विश्वासराव यांनाच संघटनेने बिनविरोध उमेदवारी जाहीर केली. गेली पंचावन्न वर्षे ते मराठवाड्यात कार्यरत आहेत. २९ जानेवारी १९६७ रोजी मराठवाडा शिक्षक संघाची स्थापना झाली. संघटनेचे जाळे मराठवाडाभर पसरलेल्या मराठवाडा शिक्षक संघाने यावेळच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली आणि ही संघटना ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे विश्वासराव यांना पहिल्या पसंतीची १३ हजार ५४३ मते मिळाली.
यापूर्वी मराठवाडा शिक्षक संघाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळवला होता. प.म. पाटील आणि पी. जी. दस्तूरकर हे मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार होते. परंतु २००४ मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या विजयाची परंपरा खंडित केली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिला. यंदा मात्र शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाचा शिरकाव नको, म्हणून मराठवाडा शिक्षक संघाने निवडणुकीच्या रिंगणात सर्व ताकद पणाला लावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.