Adv. Revan Bhosale Sarkarnama
मराठवाडा

Revan Bhosale join Samajwadi Party: पाऊस पडला कर्नाटकात, जनता दल नेत्याने छत्री उघडली महाराष्ट्रात

JDS Politics : राज्यातील पुलोदसह अनेक सरकारांमध्ये जनता दलाचा सहभाग राहिला आहे.

अनुराधा धावडे

आनंद खर्डेकर

Paranda News : देशाच्या राजकारणात स्वतःचा विचार असलेल्या जनता दल (धर्मनिरपेक्ष ) पक्षाचे प्रमुख व माजी पंतप्रधान एच .डी. देवगौडा यांनी कर्नाटकामध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्या पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. येथील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी राज्यात भाजपसोबत न जाता समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष, प्रवक्ते, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. रेवण भोसले हे येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, अॅड. भोसले यांना काही मागे भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते स्वगृही परतले होते.

राज्यातील पुलोदसह अनेक सरकारांमध्ये जनता दलाचा सहभाग राहिला आहे. बापूसाहेब काळदाते, राजारामबापू पाटील, निहाल अहेमद, संभाजी पवार, व्यंकप्पा पत्की, संभाजी काकडे, बबनराव ढाकणे, उत्तमराव पाटील , पी. के अण्णा पाटील, दादा जाधवराव, मृणाल गोरे या मातब्बर नेत्यांनी पक्षाची धुरा अनेक वर्षे सांभाळली होती.

जनता दलाकडून अनेकांनी मंत्रिपदे भूषवली होती. परंड्याचे (जि. धाराशिव) माजी आमदार कै. वासुदेवराव देशमुख हेदेखील एकत्र असलेल्या जनता पार्टीकडून विधानसभेवर निवडून गेले होते. बदललेल्या सत्तेच्या राजकीय समीकरणांत जनता दलाची विचारधारा मागील काही दिवसांत त्यांना सत्तेपर्यंत घेऊन गेली नाही. यातच जनता दलाच्या केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटकात भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे ॲड. भोसले यांनी पक्ष सोडल्याचा निर्णय घेतल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष ) राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटकमध्ये विरोधी विचारधारा असलेल्या भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय मान्य नसल्याने काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी पक्षाचे काम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे ॲड. रेवण भोसले यांनी सांगितले

अॅड. भोसलेही गेले होते भाजपमध्ये...

कर्नाटकमध्ये जनता दलाने भाजपसोबत युती केल्यामुळे नाराज होऊन समाजवादी पक्षात प्रवेश करू इच्छिणारे अॅड. रेवण भोसले यांनी स्वतः काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तेथे ते जास्त दिवस रमले नाहीत. भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष असल्यामुळे मी स्वगृही परत आलो, असे अॅड. भोसले यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT