Sambhaji Nagar Political News : खासदार इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी जोरदार तयारीला लागले आहेत. महायुती-महाविकास आघाडीच्या भांडणात पुन्हा आपल्या पतंगची हवा करत विरोधकांची दोर कापण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. यासाठी हक्काची मुस्लिम व्हाेट बँक राखत वंचितसोबतच्या आघाडीमुळे गेल्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा दलित मते मिळवण्यासाठी ओवेसी संभाजीनगरात Sambhaji Nagar तळ ठोकून आहेत.
रविवारी (ता.14) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत निळा फेटा बांधून ओवेसी फिरताना दिसले. पक्षाचे पदाधिकारी अरुण बोर्डे यांनी उभारलेल्या स्वागताच्या स्टेजवर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi ), इम्तियाज जलील बराच वेळ हजर होते. याशिवाय शहर आणि ग्रामीण भागात प्रचार सभा, काॅर्नर बैठका, मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद साधत ओवेसी यांनी इम्तियाज (Imtiyaz Jaleel ) यांच्यासाठी मतांची जमवाजमव सुरू केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचाही एमआयएमचा प्रयत्न आहे. एमआयएमचे देशात दोन खासदार आहेत, त्यात स्वतः ओवेसी आणि महाराष्ट्रातून एकमेव निवडून आलेले इम्तियाज जलील. संसदेत एमआयएमच्या खासदारांचा आकडा वाढवण्याचा या दोघांचा प्रयत्न असला तरी आधी त्यांना स्वतःचे मतदारसंघ सुरक्षित करण्याचे आव्हान असणार आहे.
2019 च्या निवडणुकीत एमआयएमने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची चर्चा देशभरात झाली होती. त्यानंतर झालेल्या बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात मिळवलेल्या विजयाचा दाखला दिला जात होता. पाच वर्षांत इम्तियाज जलील यांनी उत्कृष्ट काम केले, याची पावती स्वतः ओवेसी यांनी गेल्यावेळी संभाजीनगरात दिली होती.
आपल्यासोबत संसदेत इम्तियाज जलील हवेच, अशी खूणगाठ बांधत ओवेसी त्यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपासून शहरात ठाण मांडून आहेत. वंचित आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी अद्याप त्यांच्या प्रचाराला वेग आलेला नाही. केवळ इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करण्यातच अफसर खान हे वेळ घालवत असल्याचे दिसत आहे.
शिवाय उमेदवारी जाहीर केल्यानंतर वंचितच्या राज्य पातळीवरील एकाही नेत्याने संभाजीनगरात येऊन एखादी बैठक किंवा मेळावा घेतल्याचे दिसत नाही. दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी शहरासह ग्रामीण भागात दौरे करत प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे ओवेसी यांना इम्तियाज जलील यांना विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करून आपल्या मतदारसंघाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. आज कन्नड, वैजापूर तालुक्याचा दौरा झाल्यानंतर शहरातही ओवेसी यांच्या सभांचे नियोजन आहे.
(Edited By Roshan More)
R
.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.