Chhtrapati Sambhaji Nagar News : राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असताना इकडे संभाजीनगरात मात्र एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.
एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हैदराबादसोडून संभाजीनगरात येत आहेत. 15 एप्रिलला जिल्ह्यातील कन्नड आणि वैजापूर या दोन तालुक्यात त्यांचा दौरा असून यावेळी ते सभाही घेणार आहेत. (Imtiaz Jalil News)
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत एमआयएमने केलेली युती इम्तियाज यांना फायदेशीर ठरली होती. यावेळी मात्र एमआयएमला संभाजीनगरची जागा स्वबळावर जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. वंचित आघाडीसोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मतांची तूट भरून काढण्यासाठी एमआयएमने ग्रामीण भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
याचाच भाग म्हणून उद्या असदुद्दीन ओवेसी हे संभाजीनगर दौऱ्यावर येत असून सायंकाळी पाच वाजता इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानावर हे दोघे एकाच गाडीने समृद्धी महामार्गावरून वैजापूर आणि कन्नडला जाणार आहेत. या दोन्ही तालुक्यात ओवेसी यांच्या सभा, कॉर्नर बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. तिकडे ओवेसी यांच्या विरोधात भाजपने हैदराबाद मतदारसंघात महिला उमेदवार देत आव्हान उभे केले आहे. असे असताना महाराष्ट्रातील पक्षाच्या एकमेव खासदाराचा प्रचार करण्यासाठी ओवेसी उद्या संभाजीनगर येत आहेत.
मुस्लिम मतांचे विभाजन व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. वंचितमुळे निर्माण झालेली मतांमधील तूट आणि अफसर खान यांच्या उमेदवारीने इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुती-महाविकास आघाडी या दोघांच्या भांडणांमध्ये पुन्हा आपल्याला संधी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी जोर लावला आहे. वंचितसोबत नसल्यामुळे इम्तियाज जलील यांच्या मतांमध्ये निर्माण झालेली तूट ग्रामीण भागातून भरून काढण्यावर पक्षाने जोर दिला आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण मतदारांना पाच वर्षात केलेली कामे आणि संसदेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाला फोडलेली वाचा या जोरावर इम्तियाज जलील साद घालताना दिसत आहेत. संभाजीनगरमधील या तिरंगी लढतीत 2024 मध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला असणार आहे.
(Edited By : Sachin Waghmare)