Chhatrapati Sambhajinagar Water Issue News Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Nagar Water Issue: पाण्याचं राजकारण अखेर संपलं! संभाजीनगरात लवकरच घराघरातून ऐकून येणार नळाच्या पाण्याचा खळखळाट

Sambhaji Nagar Water Issue : कायम शिवसेना-भाजपा युतीची सत्ता राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे राजकारण पाण्याभोवती फिरत होते, पण आता हे राजकारण कायमचं थांबणार आहे.

Jagdish Pansare

Sambhaji Nagar Water Issue News: कायम शिवसेना-भाजपा युतीची सत्ता राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे राजकारण पाण्याभोवती फिरत होते. पंचवीस वर्ष सत्ता उपभोगलेल्या या दोन पक्षांना संभाजीनगरकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यात यश आले नव्हते. पण या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांनीही राजकारण करत आपली पोळी भाजून घेण्याचे काम पद्धतशीरपणे केले. नव्या पाणी पुरवठा योजना अंतिम टप्यात आल्याने आणि यात थेट सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने आता पाण्याचे राजकारण कायमचे थांबणार आहे.

तीन हजार कोटी रूपयांची नवी पाणी योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या महिनाभरात प्रत्येकाच्या घरात नळातील पाण्याचा खळखळाट ऐकू येणार आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडीतून संभाजीनगकरांसाठीचे पाणी जॅक्वेलमध्ये झेपावले. आता लवकरच हा प्रवास नागरिकांच्या घरापर्यंत होणार आहे. तब्बल 20 ते 25 वर्षांपासून शहरवासीयांना ज्या नव्या पाणीपुरवठा योजनेची आस लागली होती, त्या योजनेचा एक टप्पा गुरुवारी पूर्ण झाला.

त्यानंतर सुमारे 39 किलोमीटर अंतराची पाइपलाइन धुऊन काढत नाथसागराचे 200 एमएलडी (दशलक्ष लिटर) वाढीव पाणी 20 ते 25 दिवसांनंतर शहराच्या वेशीवर म्हणजेच नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचेल. हा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर शहरात नळाला दररोज किंवा एक-दोन दिवसांआड पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शहराला 25 वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी विविध पाणी योजनांचे मृगजळ तयार करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आणि नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले. शहराचे कर्तेकरविते आम्हीच अशा आविर्भावात स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांमुळे कधीकाळी 359 कोटी रुपयांमध्ये होणारी शहराची पाणी योजना तब्बल 2740 कोटी रुपयांवर गेली.

2016 मध्ये शेवटच्या समांतर पाणी योजनेला मूठमाती दिल्यानंतर 2019 मध्ये तत्कालीन मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नांनी 1,680 कोटी रुपयांची पाणी योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. निविदा प्रक्रिया, कामातील अडथळ्यांची शर्यत पार करून ही योजना पूर्णत्वास येण्यास 2026 उजाडले. दरम्यान, यासंदर्भात दाखल जनहित याचिकेची न्यायालयात वारंवार सुनावणी झाली. न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने प्रत्येक महिन्याला आढावा घेतला व न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्याचे 200 एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी नाथसागरातील भव्यदिव्य उद्‍भव विहिरीत पाणी घेण्याचा 19 मार्चचा गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरला, तो पूर्णत्वासही आला. नाथसागरातील विहिरीत पाणी घेण्याच्या प्रक्रियेवर न्यायालयाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कुठलीही कसर राहू नये किंवा एखाद्या चुकीमुळे विघ्न येऊ नये, यासाठी पहाटेपर्यंत तयारी करण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशानुसार, 22 किंवा 23 मार्चला पंप सुरू करायचे आहेत. त्यानुसार 100 एमएलडी पाणी उपसा करणारे दोन पंप तयार आहेत. पाइपलाइनच्या सपोर्टसाठी अनेक ठिकाणी बांधण्यात आलेले चेअर्स निकृष्ट होते. पंप सुरू करताना हे चेअर्स दुरुस्त झाले का? याची शहनिशा केली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच पंप सुरू होतील. शहराच्या पाणी योजनेचा एक टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद आहे. मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे हे काम करता आले. संपूर्ण शहरासाठी ही आनंदाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT