Latur district cooperative bank; Sambhaji Patil Nilangekar And Babasaheb Patil sarkarnama
मराठवाडा

Sambhaji patil Nilangekar : बाबासाहेब पाटील विचार सोडून काँग्रेससोबत गेले, तर त्यांना विरोध करणारच; संभाजी पाटील निलंगेकर थांबेना!

Latur DCC Bank election: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजी पाटील निलंगेकर आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवरून निलंगेकर यांनी विरोधाचा इशारा दिला.

Jagdish Pansare

Latur DCC Bank News : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील आणि भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात संघर्षाचा भडका उडाला आहे.

महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री बाबासाहेब पाटील हे जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून न लढता काँग्रेसच्या विचारांसोबत जाणार असतील, तर आमचा त्यांना कायम विरोध असेल. भविष्यात तो अधिक तीव्र होईल, असा इशारा संभाजी पाटील निलंगेकर यांनी समाज माध्यमातून दिला.

निलंगेकर म्हणाले, दोन महिन्यापूर्वी मी व आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे तुमच्या घरी आलो होतो. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक आपण महायुतीत लढू, असा शब्द तुम्ही दिला होतात. मात्र आता तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात. आमचा तुम्हाला व्यक्ती म्हणून विरोध नाही, पण ज्या विचारांच्या विरोधात महायुती लढते आहे, त्यांच्याशी जर तुम्ही हातमिळवणी करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही.

तुम्ही स्वतः लातूर जिल्हा बँकेचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यावर अनेकदा टीका केलेली आहे. याच बँकेने तुमच्या कारखान्याला कर्ज नाकारले होते, हे तुम्ही विसरलात का? असा सवाल निलंगेकर यांनी केला. वडिलांवर टीका झाली तर राग येणे सहाजिक आहे. पण ,बाबासाहेब पाटील यांच्या पुत्रांनी एकदा आपल्या वडिलांशी बोलावे, असा टोलाही निलंगेकर यांनी सोशल मिडियावर केल्या जाणाऱ्या टीकेला उद्देशून केला.

लातूर जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी नाही, एका कुटुंबासाठी..

लातूर जिल्हा बँकेचा कारभार सुरळीत सुरू आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ही बँक शेतकऱ्यांसाठी नाही, तर देशमुख कुटुंबासाठीच काम करते, येणारा काळ हा लातूर जिल्ह्यासाठी कठीण असणार आहे. दुष्काळ, पाण्याची टंचाई, शेतकर्‍यांची दुरावस्था यावर पक्षभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे. असे निलंगेकर म्हणाले.

उद्या लातूरमध्ये देशातला नाही तर जगभरातला मिडिया येईल, त्यामुळे पाण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या आपले उदिष्ट हे जिल्हा बँकेची निवडणूक घेणं हे न राहता दुष्काळावर काम करणे हे असले पाहिजे. सर्वाधिक काळ लातूर जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे, तरी देखील दुष्काळ, पाणी टंचाई सारख्या समस्यांवर आपण मात करु शकलेलो नाहीत, असेही निलंगेकर म्हणाले.

बाबासाहेब पाटलांकडून टीकेला उत्तर

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भूमिका पुढे आली नव्हती. मात्र पुढे येत त्यांनी होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला. पण महापालिकेच्या निवडणुकीत मात्र, त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत झुलवत ठेवले. शेवटच्या क्षणी युती तोडली. इतकेच नव्हे, तर दिवंगत नेते अजित पवार यांच्याशीदेखील ते खोटे बोलले.

योग्य वेळी उत्तर देऊ

मी, एक माजी मंत्री, एक आमदार असे आम्ही चर्चेसाठी जात होतो. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. महायुतीचा धर्म कोणी पाळला नाही, हे सर्वांना माहिती आहे. राज्यात लातूर जिल्हा बँक सर्वोत्कृष्ट आहे. महायुतीच्या सरकारनेही या बँकेला पुरस्कार दिले आहेत. बँकेचा कारभार पारदर्शक आहे. बँकेने काय चुकीचे केले ते सांगा. बँकेवर बोलण्यापेक्षा माझ्यावर ते बोलत आहेत. त्यांना या बँकेवर प्रशासक आणायचा आहे. निवडणूक लढवायची असेल, तर मैदानात यावे. तुम्ही काय करणार ते सांगा, आम्ही काय केले ते सांगू. आज माझ्यावर टीका केली जात आहे, योग्य वेळी उत्तर देऊ, असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT