

Maharashtra SIR: मतदारयादीतील नावे वगळल्यावरुन देशात वातावरण चांगलेच तापले असून सध्या देशभरात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने केली जात आहेत.याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील नावे वगळल्यावरुन सादरीकरण केले.
यावेळी त्यांनी राज्यातील आणि मुंबईतील मतदारांची नावे वगळल्यावरुन निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली.मतदार यादीतील तफावतींचे स्पष्टीकरण देण्याची आणि या प्रक्रियेसाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.
सादरीकरणावेळी त्यांनी २०२६ मधील मे आणि ऑगस्ट महिन्यातील निवडणूक आयोगाच्या परीपत्रकाचा संदर्भ देत राज्यातील 'SIR' प्रक्रियेदरम्यान ७ लाख ९० हजार तर मुंबईत पाच लाखांची तफावत असल्याचे सांगितले.'SIR' प्रक्रियेदरम्यान विविध गोष्टींची नोंद निवडणूक आयोगाकडून योग्यरित्या घेतली गेली नाही.माहींममधील २००२ पासून मतदान करत असलेल्या ९०० जणांची नावे मतदान यादीतून कुठल्या मापदंडावर वगळण्यात आली असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.
२०२४ ची मतदान यादी आणि निवडणूक आयोगाच्या पत्रकांवरुन ठाकरे यांनी राज्यातील ७ लाख ९० हजार मतदार नक्की गेले कुठे हा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर मुंबईतील ५ लाख मतदारही या 'SIR' प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आल्याचे त्यांनी या सादरीकरणात सांगितले.
'SIR' प्रक्रियेदरम्यान मतदार यादीच्या पडताळणीत क्षेत्रीय पातळीवर निष्काळजीपणा झाल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. अनेक मतदारांना प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी न करताच अनुपस्थित अशी नोंद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. BLO घरोघरी जावून प्रत्यक्ष पडताळणी करत होते का?,संबंधित मतदारांशी संपर्क साधण्यात आला होता का? त्यामुळे नावे वगळण्याचे नेमके निकष काय होते याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील मतदारयादीतील मुंबई, माहीम, भिवंडीतील आकडेवारींचा उल्लेख करत ठाकरे यांनी या आकडेवारींमध्ये इतकी तफावत का आहे? आणि त्यातील नेमकी कोणती आकडेवारी अधिकृत मानायची असा जाब निवडणूक आयोगाला विचारला. मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक बदलाची नोंद पारदर्शक असणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.
देशभरात जी काही आंदोलनं सुरु आहेत, राजकीय असतील अराजकीय असतील ती या देशाच्या भवितव्यासाठी आहेत म्हणून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. मतदार यादीतील कथित त्रुटी, सॉफ्टवेअरमधील मॅपिंगच्या समस्या आणि पडताळणी प्रक्रियेतील निष्काळजीपणाचे निराकरण करून निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.