sambhaji patil nilngekar
sambhaji patil nilngekar  Sarakarnama
मराठवाडा

Latur Political News : लातूर भाजपमध्ये संभाजी पाटील निलंगेकर एकाकी पडलेत का ?

Jagdish Pansare

Latur News : राज्यभरात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यांची चर्चा झाली पण ती वेगळ्याच कारणाने. या मेळाव्यांना अनेक ठिकाणी मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दांडी मारल्यामुळे महायुतीत मतभेद तर नाहीत ना? अशा चर्चांना उधाण आले होते. मराठवाड्यातील लातूरमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे गैरहजर होते. सध्या ते पक्षात एकाकी पडल्याची चर्चा या निमित्ताने होतांना दिसत आहेे.

परंतु ते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार विदेशात गेले असल्यामुळे मेळाव्याला येऊ शकले नाहीत. याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती व भाजप कार्यकर्त्यांनाही ही माहिती होती असा, दावा महायुतीच्या मेळाव्याचे संयोजक आमदार रमेश कराड यांनी केला होता. जिल्ह्यात मात्र भाजपच्या अंतर्गत गटबाजीतून निलंगेकरांनी महायुतीच्या या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती. दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर यांनीही यासंदर्भात अद्याप अवाक्षर काढलेले नाही.

महायुतीच्या मेळाव्यापासून लांब राहिलेले निलंगेकर नुकतेच मतदारसंघात परतले. उद्या देशभरात अयोध्या येथील श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. निलंगेकर यांनी या तयारीत सहभाग नोंदवत मतदार संघात सुरू असलेल्या राम कथेलाही हजेरी लावली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या महायुतीच्या मेळाव्यात संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली.

त्यांच्या विदेश दौऱ्याची माहिती कुणालाच कशी बरी नसेल? अशी शंकाही उपस्थित केली गेली. मात्र मतदार संघात परतल्यानंतरही निलंगेकर यांनी या विषयावर कुठलेही भाष्य केले नाही. लातूर जिल्हा भाजपमधील अंतर्गत गटबाजीमध्ये निलंगेकर विरुद्ध इतर नेते असे चित्र असल्याचेही बोलले जाते. भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन 45 हाती घेतलेले असताना लातूर सारख्या काँग्रेसचा पगडा असलेल्या मतदारसंघात निलंगेकरांची नाराजी निश्चितच परवडण्यासारखी नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता राज्यपातळीवरचे नेते यावर काय मार्ग काढतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendara Fadvanis) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याचे कामगार मंत्री असलेल्या निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात झिरो असलेल्या भाजपला हिरो बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता मिळवत भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला होता.

निलंगेकर सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारी पासून ते त्यांना विजयी करण्यापर्यंत निलंगेकर यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती. मग नेमकं या साडेचार वर्षात असं काय घडलं? की ज्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे नेते एका बाजूला तर निलंगेकर एकटे दुसऱ्या बाजूला असे चित्र निर्माण झाले. जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि निर्णय प्रक्रियेत निलंगेकरांवर भाजपचे जिल्ह्यातील इतर नेते वरचढ ठरताना दिसत आहेत. निलंगेकरांनी मात्र याकडे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेतून पाहण्याचे ठरवलेले दिसते.

(Edited By - Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT