Sambhajinagar Loksabha Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar Loksabha Constituency : कराड-भुमरे बाशिंग बांधून तयार; उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात ?

Shivsena-BJP News : संभाजीनगरसह मराठवाडा व राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेऊन निर्णय घेणार.

Jagdish Pansare

Marathwada Political News : लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तशी सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सत्ताधारी तीन पक्षांमध्ये कोण कुठल्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Shivsena-BJp News) छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ युतीमध्ये कायम शिवसेनेकडे राहिलेला आहे. परंतु वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे गटाला मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरची जागा सोडण्याची भाजपची इच्छा दिसत नाही.

त्यामुळेच वर्षभरापूर्वी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी विद्यमान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांना तयारीला लागा, असे आदेश दिल्याचे बोलले जाते. दुसरीकडे लोकसभेच्या जागावाटपा संदर्भात सध्या कुणीही काही बोलू नये, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगत शिंदे गटातील खासदारांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे. (Shivsena) अधूनमधून जेव्हा संभाजीनगरमधून कोण लढणार असा विषय येतो, तेव्हा शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, प्रवक्ते आमदार संजय शिरसाट या जागेवर आपलाच दावा असल्याचे सांगतात.

तर भागवत कराड संभाजीनगरमधून लढण्याची माझी इच्छा असल्याचे जाहीरपणे सांगतात. त्यामुळे संभाजीनगरची जागा नेमकं कोण लढवणार? याबद्दलचा संभ्रम कायम आहे. पाच वेळा पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले रोहयो तथा जिल्ह्याचे (Guardian Minister) पालकमंत्री संदीपान भुमरे लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीही जाहीरपणे अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे कराड हेही दंड थोपटून आहेत.

या दोन्ही नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते? हे अद्याप गुलदस्ताच आहे. भाजपकडून जागेवर दावा सांगितला जातोय, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांना गप्प राहण्यास सांगितले जात आहे, नेमका याचा अर्थ काय? यावरही जिल्ह्यांमध्ये चर्चा होताना दिसते. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी नुकतेच एका मुलाखतीत संभाजीनगरसह मराठवाड्यातील व राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

शिवाय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर आपणच मैदानात उतरू, असेही जयस्वाल यांनी सांगितले होते. आता मराठवाडा आणि महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघांमधून शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाते, याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरचा विचार केला असता, ज्या पद्धतीने भाजपने ही जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे, तशी शिंदे गटाची मात्र कुठेच दिसत नाही. यावरून ही जागा भाजपच लढवणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT