Governor Haribhau Bagde Speech News Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar News: अडीच-अडीचचा फॉर्म्युला, टर्म संपल्याने राधा किसन पठाडेंचा राजीनामा; नवा सभापती हरिभाऊ बागडे ठरवणार

Sambhajinagar News: ठरल्याप्रमाणे दुसऱ्या सहकाऱ्याला संधी मिळावी यासाठी पद सोडत असल्याचे पठाडे यांनी स्पष्ट केले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. सभापतिपदासाठी भाजपमधील संचालकांचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. त्यानुसार, ठरल्याप्रमाणे दुसऱ्या सहकाऱ्याला संधी मिळावी यासाठी पद सोडत असल्याचे पठाडे यांनी स्पष्ट केले.

रिक्त झालेल्या पदावर वर्णी लागावी यासाठी भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे नवा सभापती ठरवणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे 'कौन बनेगा सभापती' याची उत्सकूता सगळ्यांना लागली आहे. एप्रिल-2023 मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-सेनेने जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती ताब्यात घेतली होती. त्यानंतर सभापतिपदासाठी भाजपमधील संचालकांचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता.

त्यानुसार विद्यमान सभापती राधाकिसन पठाडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या अगोदर 2017 ते 2020 याकाळात पठाडे यांनी बाजार समितीचा कारभार चालविला. यात त्यांनी 90 कोटींची विविध विकास कामे केली. तर 2023 ते 2025 या कार्यकाळात दुसऱ्यांदा संधी मिळाली तेव्हा त्यांनी ५० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याचे सांगितले.

पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा, शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष दिल्याचा दावा पठाडे यांनी केला. रस्ते, गोडाऊन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून हे वसतिगृह पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे पठाडे यांनी सांगितले.

वादग्रस्त ठरला कार्यकाळ

राधाकिसन पठाडे यांचा कार्यकाळ काहीसा वादग्रस्तही ठरला. त्यांच्यावर 88 कोटींचा भ्रष्टाचार व बेकायदेशीर खर्च केल्याची तक्रार सहकार विभागाकडे दाखल करण्यात आली होती. तत्कालीन चौकशी अधिकारी तथा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी या संदर्भात दीडशे पानांचा चौकशी अहवाल तयार करत बेकायदेशीर कामांसाठी पठाडे जबाबदार असल्याचे नमूद केले होते. याच चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. कोर्टाच्या कारवाईच्या आदेशाविरोधात तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पठाडे यांनी अपील केले होते. यावर अधिकार नसतांना आदेश दिल्याबद्दल न्यायालयाने सत्तार यांनाही फटकारले होते.

बागडेंचा आशिर्वाद कोणाला?

राधाकिसन पठाडे यांच्या राजीनाम्यानंतर नवा सभापती कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याकडे शिफारशीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता बागडे यांचा आशिर्वाद नेमका कोणाला मिळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सभापतिपदासाठी बाजार समितीचे संचालक रामबाबा शेळके, गणेश दहिहंडे, दत्ता उकिर्डे, अभिजित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे.

पक्षीय बलाबल

भाजप- 9

काँग्रेस-2

शिवसेना (उद्धव ठाकरे)-2

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-1

व्यापारी संघटना- 2

हमाल संघटना-2

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT