छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून पालकमंत्री संजय शिरसाटांनी जिल्हाप्रमुखावर सार्वजनिकरित्या संताप व्यक्त केला.
‘कुठं जायचं तिथे जा’ असे वक्तव्य करत शिरसाटांनी दिलेला इशारा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय.
या वादामुळे पक्षात ध्रुवीकरण तीव्र झाल्याची चर्चा असून युतीत तणाव वाढण्याची शक्यता.
Shivsena Politics News : छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. पक्षातून एकएक पदाधिकारी बाहेर पडत असताना याबद्दल जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बाहेरून आलेल्यांना पदं, अधिकार दिले जात आहेत. जिल्हाप्रमुख असताना मला विश्वासात घेतले जात नाही, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीकडेच बोट दाखवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबद्दल आपण तक्रार करणार असल्याचे जंजाळ यांनी माध्यमांकडे बोलून दाखवले.
राजेंद्र जंजाळ यांच्या या जाहीर टीका आणि थेट माध्यमांकडे जाण्याच्या प्रकाराने संजय शिरसाट कमालीचे संतापले आहेत. राजेंद्र जंजाळ यांना जिल्हाप्रमुख मी केले, काही अडचण असल्यास मला सांगितले पाहिजे, सगळीकडे असे बोंबलत फिरणे कशासाठी? अशा शब्दात शिरसाट यांनी जंजाळ यांची कानउघाडणी केली. तसेच त्यांना कुठे जायचे तिकडे जावे, असे म्हणत इशाराही दिला. ऐन नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या मनातील खदखद पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, फुलंब्री नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व इतर तीघांनी एबी फार्मसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाहेर आली. कालच त्यांनी मुंबई गाठत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण ते विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने ही भेट होऊ शकली नव्हती. आज संभाजीनगरमध्ये शिंदे येणार आहेत, त्यांची आपण भेट घेऊन त्यांना सगळा प्रकार सांगणार असल्याचे जंजाळ यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले होते.
राजेंद्र जंजाळ यांनी पक्षातील गोष्टी थेट माध्यमांसमोर नेल्याने पालकमंत्री संजय शिरसाट कमालीचे संतापले आहेत.यावर प्रतिक्रिया देताना राजेंद्र जंजाळ विद्वान आहे, ते तक्रार करतात, पण का? त्याचे कारण त्यांना आणि मला माहित आहे. सगळीकडे असे बोबलंत फिरणे, कशासाठी तुम्ही हे करत आहात याचे योग्य वेळी मिळतील. काही अडचण असल्यास मला सांगितले पाहिजे, त्यांना जिल्हाप्रमुख मी केले.
अति महत्वकांक्षा वाढल्याने असे होत आहे. त्यांना एकहाती पक्ष पाहिजे आणि ते शक्य नाही. माझ्या परिवारावर आरोप करताना त्यांना लाज वाटली पाहिजे, मी त्यांना चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. त्यांना कुठं जायचे असेल त्यांनी जावे. तुम्हाला इतर पक्षातून आलेले लोक चालत नाही ही भूमिकाच मुळी चुकीची आहे. अशाने पक्ष चालत नसतो वाढत नसतो, सर्वाना सामावून घेऊन चालावे लागते.
आरोप करून वातावरण निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. जिल्हाप्रमुखाचे अधिकार काय असतात हेच त्यांना कळत नसेल तर पक्ष कसा चालणार? असा सवाल करत संजय शिरसाट यांनीही राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात बाह्या सरसावल्या आहेत. एकूणच छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये आता लाथाळ्या सुरू झाल्याचे चित्र आहे. पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांच्यावर संघटनात्मक आणि जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी असली तरी पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि मतभेद मिटवणे याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागेल.
राजेंद्र जंजाळ यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरवाजा ठोठावला आहे. आता शिंदे या वादावर कसा तोडगा काढतात? जंजाळ यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते, की मग संजय शिरसाट सांगतिल तेच मान्य केले जाईल? यावर पक्षात किती मोठी फूट पडणार हे अवलंबून असणार आहे.
1. वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला?
संघटनात्मक निर्णय आणि नेतृत्वाच्या अधिकारावरून मतभेद झाले.
2. संजय शिरसाटांनी काय वक्तव्य केले?
त्यांनी सार्वजनिकपणे जिल्हाप्रमुखावर संताप व्यक्त केला आणि “कुठं जायचं तिथे जा” असा इशारा दिला.
3. युतीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
तणाव वाढण्याची आणि पक्षभंगाच्या शक्यता वाढण्याची चर्चा.
4. स्थानिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय आहे?
कार्यकर्त्यांमध्ये ध्रुवीकरण दिसून येत असून वातावरण तापले आहे.
5. पुढील घडामोडी काय असू शकतात?
वरिष्ठ नेतृत्वाकडून हस्तक्षेप किंवा नवीन संघटनात्मक बदल संभव.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.