भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या हालचालींवर संजय शिरसाट यांनी मोठा संताप व्यक्त केला.
“आमचा संयम संपतोय” असे म्हणत त्यांनी भाजपला थेट इशारा दिल्याने महायुतीत तणाव वाढला आहे.
संभाजीनगरच्या राजकारणात या वक्तव्यामुळे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता बोलली जाते.
योगेश पायघन
Shivsena-BJP Clash News : आधी विधानसभेला विरोधात लढलेले राजू शिंदे, त्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख, फुलंब्री नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपने फोडला. आता छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुखही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. महायुतीतील पक्षांनी आपआपसात लोक घ्यायचे नाहीत, फोडाफाडी करायची नाही हा अलिखीत करार तिन्ही पक्षात झालाय. तरी संभाजीनगरात काही लोकांना पैशांची मस्ती आली आहे, याचा परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील, असा इशारा शिरसाट यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
वर्चस्व सिद्ध करायला आम्ही जर एखादे पाऊल उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नका. आम्ही संयम राखला आहे, पण संयमाला मर्यादा असते. दरवेळी चुक करून त्यावर पांघरून घालायचे ही वृत्ती बरोबर नाही. आमचा संयम आता सुटत चालला आहे, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. फुलंब्रीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार स्वखुशीने गेला आहे का? त्यावर काय प्रेशर होते? असे म्हणत गंगापुर, वैजापुर, खुलताबाद, फुलंब्री येथे काय सुरू आहे ? हे थांबवा. नाराजी वाढतेय संभ्रम निर्माण होतोय, एका निवडणूकीचा परिणाम दुसऱ्या निवडणूकीवर होईल. प्रत्येक जण अशी फोडाफाडी केल्यास पुढे महायुतीत लढता येणार नाही.
एक लक्षात घ्या कोणत्याही ॲक्शनला रिॲक्शन असते. त्याच्यावर निर्णय वरिष्ठांनी घेतला पाहीजे. प्रचार करायचा की फोडाफाडीचे राजकारण करायचे? हे एकदा ठरवले पाहीजे. लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश द्या, असे होत नाही हे चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगले माहिती आहे. प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लखलाभ, आम्ही भाजपचे लोक घेत नाही मग त्यांनी आमचे उमेदवार, पदाधिकारी फोडणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलतांना ते म्हणाले, अजित पवार अर्थमंत्री आहेत त्यांना अधिकार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असतात. तिजोरीचा मालक कुणी का असेना निर्णय घेतांना सर्वजण ठरवतात. आमच्याकडून होणाऱ्या विकासाच्या आड कुणी येऊ शकत नाही. आल्यास, आम्हाला निधी कमी पडल्यास आम्ही बोलू. सगळे नेते विकास करतात, प्रत्येकाला आपला भाग प्रिय आहे. अजित पवार त्यांच्या नेत्यांबद्दल बोलले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी इतर नेत्यांबद्दल असे बोलू नये, असेही शिरसाट म्हणाले.
घराणेशाहीची लाट आलेली आहे हे मान्य पण, लोकशाहीत सर्वकाही जनतेच्या स्वीकारण्यावर आहे. हे लोण सगळीकडे पसरले आहे. कुणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही, असेही शिरसाट म्हणाले. मतदार याद्यातील घोळासंदर्भात विरोधकांनी निवडणूक आयोगाला दिलेले पत्र हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. त्यांनी वेगळे असे काही सांगितले नाही. त्रुटी दुरुस्त करायला हव्यात असे आमचेही मत आहे. निवडणूक यादी बनवणे खेळ नाही , कुठलाही अधिकारी याद्या कशा असाव्यात असे विचारात नाही, असेही शिरसाट म्हणाले.
1. संजय शिरसाट का संतापले?
भाजपकडून शिवसेनेतील कार्यकर्त्यांची फोडाफोड करण्याच्या हालचाली होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
2. त्यांनी कोणता इशारा दिला?
“आमचा संयम संपतोय” असे म्हणत त्यांनी भविष्यात कठोर भूमिका घेतली जाऊ शकते असे संकेत दिले.
3. या वक्तव्याचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यातील तणाव वाढू शकतो.
4. हे संभाजीनगरच्या राजकारणात काय बदल घडवू शकते?
स्थानिक स्तरावर समन्वय बिघडल्यास निवडणुकीतील समीकरणे प्रभावित होऊ शकतात.
5. भाजपकडून काही प्रतिक्रिया आली आहे का?
या बाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नसली तरी अंतर्गत चर्चेला वेग आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.