Sanjay Bansode News  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Bansode : बनसोडेंना आधी मंत्रीपद, आता पक्ष मजबूत करण्याचे टार्गेट..

Latur Political : २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत झालेल्या तिरंग्या लढतीत बनसोडेंचा निसटता पराभव झाला होता.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : अजित पवार म्हणतील ती पूर्व दिशा आणि त्यांचा आदेश म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असं मानणारे त्यांचे अत्यंत विश्वासू मंत्री संजय बनसोडे. (Sanjay Bansode) राष्ट्रवादीत झालेल्या दोन्ही बंडाच्या वेळी अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. अर्थात बनसोडे यांना पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्याची किमया अजित पवारांचीच. त्यामुळे अजित पवारांचा शब्द बनसोडे यांच्यासाठी अंतिम असतो.

अजित पवारांच्या नेतृत्वात नुकत्याच झालेल्या (NCP) राष्ट्रवादीतील बंडातील संजय बनसोडे हे एक शिलेदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर पहिल्या नऊ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये बनसोडेंचा समावेश त्यांचे अजित पवारांच्या मनातील स्थान अधोरेखित करतो. (Ajit Pawar) अजित पवारांनी आधी बनसोडे यांना मंत्री करत त्यांना राज्यातील महत्त्वाची जबाबदारी दिली. आता त्याच बनसोडेंवर पक्षफुटीनंतर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत पक्ष मजबूत करण्याचे टार्गेट देखील दिले आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित आहेत. उदगीर मतदारसंघातून स्वतः बनसोडे निवडून आलेले आहेत, तर अहमदपूरमधून बाळासाहेब पाटील. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता या जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढवण्यासाठी संजय बनसोडे यांना मंत्रिपदाचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. केवळ लातूरच नाही तर शेजारच्या धाराशिव जिल्ह्यासह हिंगोलीत पक्षवाढीची मोठी जबाबदारी बनसोडे यांच्यावर असणार आहे.

धाराशिव जिल्हा हा कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून या जिल्ह्यात राष्ट्रवादीला मरगळ आली आहे. आता नव्याने या जिल्ह्यात मुसंडी मारण्याची तयारी अजित पवारांनी सुरू केली आहे. अर्थात याची जबाबदारी त्यांनी बनसोडे यांच्या खांद्यावर टाकली आहे. हिंगोलीत राष्ट्रवादीला नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. बनसोडे या जिल्ह्यात कशा पद्धतीने पक्ष वाढवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बनसोडे यांनी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे काम केलेले असल्यामुळे त्यांना संघटना बांधणीचा अनुभव आहे. १९९२ ला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांच्यावर होती. नामांतर चळवळीमध्ये शरद पवार यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्याकडे प्रारंभी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी होती.

त्यानंतर अनेक वर्षे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही ते कार्यरत होते. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचा हा अनुभव लक्षात घेता अजित पवारांनी संघटना बांधणीसाठी केलेली निवड योग्यच असल्याचे बोलले जाते. २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत झालेल्या तिरंग्या लढतीत बनसोडेंचा निसटता पराभव झाला होता. पराभवानंतर त्यांनी पाच वर्ष मतदारसंघात काम केले.

भाजपची ताकद असलेल्या उदगीरमधून बनसोडे वीस हजार मताधिक्याने विजयी झाले होते. पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांच्याच रुपाने उदगीरला ३५ वर्षानंतर मंत्रीपदही मिळाले. पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीपद मिळवण्यात बनसोडे यशस्वी झाले होते. महाविकास आघाडी सरकारनंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट पदी बढती मिळाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT