Chhatrapati Sambhajinagar News, 29 May : मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) प्रश्नावर राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणि त्यातून जातीयवाद उफाळल्याच्या कारणावरून वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात याचा मोठा परिणाम दिसून आला. लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतरही मराठा विरुद्ध ओबीसी, असा वाद सुरूच आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) हे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला जातोय. बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या लोकांवर, दुकानावर बहिष्काराच्या सोशल मिडियावरील व्हिडीओने या वादात भर पडली. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"अन्य समाजाचे नेते जसे राजकीय दबाव टाकून आपल्या मागण्या मान्य करून घेतात, तसा प्रयत्न जर मराठा समाजाने मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून केला तर इतरांच्या पोटात दुखण्याचे काय कारण?" असा रोखठोक सवाल संजय जाधव ( Sanjay Jadhav ) यांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना केला. "मुळात मराठा-ओबीसी समाजात वाद भाजपने निर्माण केला," असा आरोपही जाधव यांनी केला. परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रचारात यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद मोठ्या प्रमाणात झाला.
महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना परभणीतील उमेदवारीच मुळात जातीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिली गेली. मतदारसंघातील ओबीसी, वंजारी मतांची संख्या पाहता ते परभणीतून लढायला आले. परभणीत जातीयवादाला सुरूवात जानकरांनी केली, त्यामुळे मराठा समाज एकवटला. त्याचा फायदा निश्चितच मला झाला आणि मी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा दावा यापुर्वीच जाधव यांनी केला होता.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातच जाधव यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या सत्कार केला होता. त्यानंतर विरोधक तुटून पडलेले असताना जाधव यांनी मनोज जरांगे यांची बाजू घेत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
"मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा भाजप अन त्यांच्या नेतृत्वानेच लावला. बीडमध्ये घडलेली घटना पुन्हा घडू नये," अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
"आजपर्यंत ओबीसी समाजासाठी भुजबळ, पडळकर, शेंडगे, जानकर यांच्यासह अनेकांनी लढा दिला. सरकारवर दबाव आणून काही मागण्या मान्य करुन घेतल्या. त्यामध्ये मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी तसाच प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? प्रत्येकाला स्वत:च्या समाजासाठी मागण्या करण्याचा अधिकार आहे. मग मराठा समाज रस्त्यावर उतरला तर तो दोषी कसा? मराठ्यांनी ओबीसीतून किंवा सगेसोयऱ्याचे आरक्षण मागणे चुकीचे आहे का?" असा प्रश्नही जाधव यांनी या निमित्ताने उपस्थित केला.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.