Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना-भाजप या महायुतीतील घटक पक्षांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत युती तोडली. प्रचार सभांमधून खासदार, आमदार, मंत्र्यांनी उणीदुणी काढली. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मात्र एका मतदान केंद्रावर भाजपचे आमदार संजय केनेकर आणि शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी एकमेकांची गळाभेट घेत कानगोष्टीही केल्या. मतांसाठी भांडणारे हे दोन पक्ष महानगर पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काय भूमिका घेणार? याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
छत्रपती महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सुरवात झाली. पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात गोंधळ दिसून आला. पण दहा वर्षांनी महापालिकेची निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह देखील आहे. पण राजकीय नेत्यांच्या दुटप्पी आणि सोयीच्या राजकारणाचा अनुभव या निमित्ताने पहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपसह सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत.
शिवसेनेने युती तोडल्याचा भाजपच्या नेत्यांनी आरोप केला, तर भाजपच्या हट्ट आणि अंहकारामुळे युती तुटल्याचे खापर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर फोडले. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या स्थानिक नेत्यांनी प्रचारात हातचे न राखता एकमेकांवर टीका केली. भाजपचे आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनी पालकमंत्री संजय शिरसाट (sanjay Shirsat) यांनी घरातच दोन उमेदवार दिल्याचे सांगत सामान्य शिवसैनिक तुम्हाला दिसले नाहीत का? असा सवाल केला होता. तुम्ही व्हाईट हाऊसमध्ये राहता अन् शिवसैनिकांना राहायला घर नाही, अशी खोचक टीकाही केनेकर यांनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना ते महाराष्ट्राचे मालक आहेत, असा वादग्रस्त उल्लेख केल्यामुले केनेकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. शिवसेनेच्या उमेदवारांसाठी फिरणारे खासदार संदीपान भुमरे यांनी आज त्याच संजय केनेकर यांची गळाभेट घेत आम्ही एकच आहोत, हे कृतीतून दाखवून दिले. सकाळी एका मतदान केंद्रावर संदीपान भुमरे आणि संजय केनेकर समोरासमोर आले. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली. तेव्हा दोघे एकमेकांच्या कानातही कुजबुजले. हे चित्र पाहून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदानासाठी आलेले सर्वसामान्य मतदारही बुचकळ्यात पडले नसतील तर नवलच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.