Hingoli News : राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झाले असून, कुठल्याही जागेबद्दल आता वाद राहिलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागा देऊ केल्या आहेत. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी विचार करायचा आहे. महाविकास आघाडीचे राज्यातील जागावाटप येत्या 72 तासांत जाहीर करू, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गटाच्या वीस उमेदवारांची जी यादी प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहे ती चुकीची आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप आम्ही एकत्रितपणे जाहीर करू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या नांदेड, हिंगोली दौऱ्यावर आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांच्या जनसंवाद सभा, मेळावे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका या दोन्ही जिल्ह्यांत होणार आहेत. (MP Sanjay Raut News )
त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत हेही असून, प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भात विचारणा केली. यावर आम्ही आता आणखी जास्त दिवस उमेदवारांची यादी दडवून ठेवू शकत नाही. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे, त्यामुळे येत्या 72 तासांत महाविकास आघाडीचे राज्यातील उमेदवार आम्हाला जाहीर करावेच लागतील. शिवसेनेच्या वीस उमेदवारांची यादी प्रसारमाध्यम दाखवत आहेत, मात्र ती चुकीची असून काही अंदाज लावून ती सांगितली जात आहे.
राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे तीनही पक्षांची एकत्रित यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची यादी स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार नाही. जी नावे माध्यमांकडे आली आहेत ती मी पाहिली, परंतु ती चुकीची आहेत. शिवसेना परस्पर आपली यादी जाहीर करणार नाही, महाविकास आघाडीचे संकेत आम्हाला पाळावे लागतील आणि आम्ही ते पाळू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेवरून सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. याकडे राऊत यांचे लक्ष वेधले असता, आम्हाला दहा तोंडाचा रावण म्हणणाऱ्यांनी एकदा रामायणाचा अभ्यास करावा, त्यांच्यावर राम नाम सत्य है म्हणण्याची वेळ येईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीशी जागावाटपावरून आता कुठलाही वाद राहिलेला नाही. आम्ही त्यांना सन्मानजनक चार जागा देऊ केल्या आहेत. त्या प्रस्तावावर आता आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे म्हणत राऊत (Sanajay Raut) यांनी चेंडू वंचितच्या कोर्टात टोलवला.
(Edited By : Sachin Waghmare )
R