Sanjay Shirsat-Eknath Shinde-Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : मंत्रीपदासाठी शिंदेची पसंती कोणाला? काठावर पास सत्तार की शिरसाट ?

Shinde’s preference for ministerial post Abdul Sattar or Shirsat? : संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यापैकी मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पैकी संजय शिरसाट 16351, अब्दुल सत्तार 2420 तर विलास भुमरे हे 29192 मताधिक्य घेत विजय मिळवला.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : महायुतीला राज्यात घवघवती यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू आहे. `कौन बनेगा मुख्यमंत्री`हे अद्याप ठरलेले नसले तरी नव्या मंत्रीमंडळात आपली खुर्ची निश्चित करण्यासाठी निवडून आलेल्या माजी मंत्री, आमदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 मध्ये महायुतीला सर्व नऊ आमदार निवडून दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेचे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि भाजपचे अतुल सावे हे तीन मंत्री होते. भुमरे लोकसभेवर गेल्यामुळे (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करण्यात आले होते. पण ते अगदी दोन महिन्यासाठीच. आता नव्या मंत्रीमंडळात पैठणमधून निवडून आलेले खासदार पूत्र विलास भुमरे, विजयाचा चौकार ठोकणारे संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यापैकी मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पैकी (Sanjay Shirsat) संजय शिरसाट 16351, अब्दुल सत्तार 2420 तर विलास भुमरे हे 29192 मताधिक्य घेत विजय मिळवला. शिरसाट, भुमरे यांचा विजय सहज झाला पण माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना मात्र विजयासाठी झगडावे लागले. शिवसेना महाविकास आघाडीच्या सुरेश बनकर यांनी सत्तार यांना शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवले. सत्तार यांचा विजय घोषित करतांना झालेला गोंधळ यावरून या निकालाबद्दल संशयही व्यक्त केला गेला. परंतु आता या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही.

मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. अगदी अडीच वर्षापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सत्तार-शिरसाट यांच्यात स्पर्धा होती. नंतर ही स्पर्धा हातघाईवर आल्याचेही दिसून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मंत्रीपदावरून सत्तार-शिरसाट एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची चर्चा होती.

अजित पवार व त्यांच्या समर्थकांची सरकारमध्ये एन्ट्री झाली तेव्हा, शिरसाट मंत्रीपदाची आशा बाळगून होते, पण तेव्हा ते शक्य झाले नाही. तत्कालीन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली व ते जिंकले. त्यानंतर त्यांच्याकडील पालकमंत्री पद मिळवण्यासाठी पण सत्तार आणि शिरसाट यांच्यात रस्सीखेच झाली.

भुमरे यांनी सत्तार यांना पालकमंभत्री करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आणि पुन्हा शिरसाट यांना माघार घ्यावी लागली होती. शिरसाट यांनी सत्तार पालकमंत्री होऊ नये यासाठी जंगजंग पछाडले, मात्र जिल्ह्यात शिवसेनेचे सत्तार हेच एकमेव मंत्री असल्याने त्यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडलीच. आता मात्र शिरसाट कुठल्याही परिस्थिती माघार घेण्याची शक्यता दिसत नाही. शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिळवलेला हा सलग चौथा विजय आहे.

तर सत्तार हे देखील सिल्लोडमधून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. पण यावेळी सत्तारांचा झालेला विजय हा अटीतटीच्या लढतीतून झालेला आहे. केवळ 2420 मतांनी त्यांना विजय मिळाला. पैठणमधून विलास भुमरे तीस हजाराहून अधिक मताधिक्याने निवडून आले असले तरी ते मंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या तरी नसतील.

अर्थात खासदार भुमरे मुलाला मंत्री करण्यासाठी प्रयत्न करतील पण दोन सिनियर आमदार जिल्ह्यात असल्यामुळे विलास भुमरे यांना मंत्रीपदासाठी वेटिंगवर ठेवले जाईल. आता एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सत्तार-शिरसाट यांच्यातील संघर्ष टाळून कोणाला एका मंत्री करावे लागणार आहे. अशावेळी शिंदे कोणाला झुकते माप देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT