Sanjay Shirsat | Imtiaz Jaleel Defamation Case | Court Summons Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : संजय शिरसाटांच्या कुटुंबीयांवर आरोप करणे जलील यांना भोवणार? कोर्टाने धाडली नोटीस

Sanjay Shirsat files case against Imtiaz Jaleel : आर्थिक गैरव्यवहार, बेकायदा जमीन वाटप, बेहिशेबी मालमत्ता या विषयी पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी जाहीर आरोप केले होते. संबंधित व्यवहार शिरसाटांच्या मुलांशी निगडीत असताना पालकमंत्र्यांवर आरोप करणे प्रथमदर्शनी मानहानकराक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 24 Nov : शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय संघर्ष आता थेट कोर्टात गेला आहे. पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी १३ जून २०२५ रोजी इम्तियाज जलील यांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी मानहानिची याचिका दाखल केली होती. या प्रकरणात आता इम्तियाज जलील यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

द्वितीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एम.ए. सय्यद यांनी इम्तियाज यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ३५६ (१),(२),(३) अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. जलील यांनी शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित जमीन व्यवहारांवर गंभीर आरोप केल्यानंतर शिरसाट यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला होता.

आर्थिक गैरव्यवहार, बेकायदा जमीन वाटप, बेहिशेबी मालमत्ता या विषयी पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी जाहीर आरोप केले होते. संबंधित व्यवहार शिरसाटांच्या मुलांशी निगडीत असताना पालकमंत्र्यांवर आरोप करणे प्रथमदर्शनी मानहानकराक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

वादाची पार्श्वभूमी काय?

जून २०२५ मध्ये इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट यांच्यावर जमीन खरेदी आणि पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले होते. यात प्रामुख्याने शेंद्रा एमआयडीसीमधील औद्योगिक भूखंड, जालना रोड परिसरातील जमीन व्यवहार, शहाजापूर येथील जमीन व्यवहार याचा उल्लेख केला होता. या तीन जमिनींचे एकत्रित मूल्य सुमारे १३ कोटी रुपये असल्याचा दावा करताना शेंद्रा एमआयडीसीतील सुमारे पाच एकर भूखंड शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांना नियमबाह्य पद्धतीने मिळाल्याचा आरोप त्यांनी केला होता. भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचाही त्यांचा दावा होता.

परंतु संजय शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या आणि पत्नीच्या व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचे म्हंटले होते. संजय शिरसाट यांनी १३ जून २०२५ रोजी इम्तियाज जलील यांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीची याचिका दाखल केली होती. ५ जून २०२५ रोजी इम्तियाज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेली विधाने बदनामीकारक असल्याचे शिरसाट यांचे म्हणणे होते.

शिरसाट यांच्या वतीने ॲड. राजेश काळे यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. सिद्धांत शिरसाट आणि विजया शिरसाट यांनी एमआयडीसीकडे स्वतंत्रपणे भूखंडासाठी अर्ज केला होता. एमआयडीसीने अर्जाचा विचार करून नियमानुसार भूखंड दिला. या व्यवहारात संजय शिरसाट यांचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. संजय शिरसाट यांनी भूखंड मिळवून देण्यासाठी कोणतेही शिफारसपत्र दिले नव्हते. तरीही इम्तियाज यांनी संजय शिरसाट यांनी सत्तेचा गैरवापर करून मुलासाठी भूखंड मिळवून दिल्याचा आरोप केला. या विधानांमुळे आपली राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाली, असा शिरसाट यांचा दावा आहे.

तर आपण केलेले आरोप बिनबुडाचे नसून त्यासाठी आपल्याकडे कागदपत्रे आणि पुरावे आहेत, असा दावा जलील यांनी केला होता. शिरसाट यांच्याविरोधातील जमीन व्यवहारांचे पुरावे घेऊन आपण मुंबईत सीबीआय कार्यालयात जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे एका बाजूला शिरसाट यांनी मानहानीचा दावा दाखल केला, तर दुसऱ्या बाजूला जलील यांनी संबंधित व्यवहारांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT