Marathwada Politics : राज्यात अनपेक्षितपणे सत्तेवर आलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळेल या आशेवर असलेल्या शिवसेनेतील अनेकांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. सलग तीन टर्म निवडून आल्यामुळे आपल्या किमान राज्यमंत्रीपद तरी मिळेल अशी अपेक्षा बाळगून होते.
पण तीन पक्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षातील आपल्या आमदारांना डावलत काही अपक्ष आमदारांना कॅबिनेट, राज्यमंत्री केले. तेव्हापासून शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मनात आपल्याला डावलल्याची सल घर करून आहे. अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेले बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरात आमदार संजय शिरसाट हे शिंदेच्या पाठीशी सावली सारखे वावरत होते.
एवढेच नाही, तर सुरतच्या हाॅटेलमधून सर्वात पहिले जाहीर पत्र लिहित शिरसाट यांनीच ठाकरेंना अंगावर घेतले होते. कदाचित नव्या सरकारमध्ये तरी आपल्याला मंत्रीपदाची लाॅटरी लागेल या आशेपायी त्यांनी ठाकरेंवर उघडउघड टीका करत शिंदेंचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. पण जे आघाडी सरकारमध्ये घडले तेच शिंदे-भाजप सरकारमध्ये देखील शिरसाटांच्या बाबतीत घडले. इथेही त्यांना वेटिंगवरच ठेवण्यात आले.
कधी नव्हे ते जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपद मिळाली, पण त्यात शिरसाट नव्हते. त्यामुळे त्यांचा हा दुहेरी राग ते उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्त करतांना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या आधी प्रसार माध्यमांशी बोलतांना शिरसाट यांचे टार्गेट उद्धव ठाकरेच आहे हे दिसून आले.महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मंत्रीपद देणे शक्य असतांना त्यांनी शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री व दोन अपक्षांना राज्यमंत्री का केले? हे त्यांनी आजच्या सभेतून जाहीर करावे, असे आव्हानच शिरसाटांनी ठाकरेंना दिले आहे.
ही मंत्रीपद खोके घेवून दिल्याचा शिरसाटांचा आरोप आहे. शिंदे गटासोबत गेलेल्या ५० आमदारांना राज्यभरात पन्नास खोके घेतल्याचा आरोप सहन करावा लागत आहे. यावरूनच शिरसाटांनी गडाख व त्यांच्यासह दोन अपक्षांना मिळालेल्या राज्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थितीत करत त्यासाठी खोके घेतल्याचा आरोप केला आहे. एकंदरित शिरसाटांना मंत्रीपद न मिळाल्याची सल त्यांच्या ठाकरेंविरुद्धच्या आक्रमकतेतून अधिकच जाणवते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.