Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून सतिश चव्हाण यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या सभेत बोलताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले, माझी कोणती शाळा नाही की काॅलेज, तरी मला व्यासपीठावर बोलावलं. चार लाख मतदार आणि वीस किलोमीटरचा मतदारसंघ असताना आम्हाला सगळ्या मतदारांपर्यंत पोहचता येत नाही.
पण सतीश चव्हाण यांचा पदवीधर मतदारसंघ हा ७६ तालुक्याचा आहे. प्रचाराला अठरा दिवस असताना सतीश चव्हाण इतक्या तालुक्यातील मतदारांपर्यंत कसे पोहचत असतील? खरचं त्यांना मानावं लागेल, अशा शब्दात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या विजय संकल्प सभेत टोलेबाजी केली. मला आयुष्यात कधी संधी मिळाली तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार नाही, असे शिरसाट म्हणाले.
महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराचे नाव तुम्ही कधी ऐकले का? तुमची महाविकास आघाडीशी काही काळ असलेली मैत्री म्हणून तुमच्याविरोधात कमकुवत उमेदवार दिला का? यामागे तुमचाच हात तर नाही ना? असा चिमटाही शिरसाट यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना काढला.
महायुतीकडून सतीश चव्हाण यांची उमेदवारी आज जाहीर केल्यानंतर त्यांनी महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत संजय शिरसाट यांनी जोरदार फटकेबाजी केली. अतुल सावे हे मोठे कलाकार आहेत, त्यांना सोबत ठेवा, त्यांना सोडू नका, असा सल्ला शिरसाट यांनी दिला.
माझी कोणतीही शाळा, काॅलेज नाही, तरी मी व्यासपीठावर कसा? असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल? पण मीआयुष्यात कधीही पदवीधरची निवडणूक लढवणार नाही. ७६ तालुक्यात अठरा दिवसात प्रचार कसा करायचा? माझा मतदारसंघ २० किलोमीटरचा, चार लाख मतदार, तरी तीस टक्के ठिकाणी मी पोहचू शकत नाही. प्रचाराला वेळ कमी मिळतो, अर्धावेळ कार्यकर्त्याला समजवण्यात जातो. त्यानंतर प्रचार, रणनिती ठरवली जाते, त्यात पुन्हा निवडणूक प्रमुख कोण राहील? यावरून वाद होतात.
निवडणूक लढवणे जिकरीचे काम आहे, सतीश चव्हाण हे तीन वेळा मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढले, त्यांना हे कसं जमतं माहित नाही? सतीश चव्हाण हेच उमेदवार असणार हे दोन दिवस आधीच स्पष्ट झाले होते. ते एबी-फाॅर्म घेऊन आले होते, हे फक्त त्यांना आणि मलाच माहित होते. अतुल सावेंना आज कळाले, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.
मराठवाडा पदवीधरमध्ये स्पर्धा नसते, त्यामुळे दोन-तीन नावांमधून एक निवडायचे असते. आमच्याकडे तसे नाही, त्यात मंत्री व्हायला तर फार त्रास सहन करावा लागतो. मी चारवेळा आमदार झालो, तेव्हा पहिल्यांदा मंत्री झालो. पण आमचे मित्र अतुल सावे तीनवेळा आमदार आणि तीनवेळा मंत्री झाले, असा चिमटाही त्यांनी सावे यांना काढला.
सुनेत्रा पवारांसोबत जो राहील त्याचा नंबर मंत्रिमंडळात लागेल, असे सांगत शिरसाट यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या 'आमच्या नावापुढे नामदार का लागत नाही? यावर भाष्य केले. अजित पवारांनी जे तुमच्यासाठी केले ते कोणी करणार नाही, त्यांना विसरू नका. जिथे तुम्ही कमी पडला, तिथे अजितदादा उभे राहिले. त्या नेत्याला मी जवळून पाहिले होते, त्यांचे माझे जमतं होतं, असे म्हणत शिरसाट यांनी अजित पवारांची आठवण काढली.
सभेत बोलताना शिरसाट यांनी हा सजंय खर बोलतो, तो संजय (संजय राऊत) खोटं बोलतो. चांगला रिझल्ट येतो तिथेच मी जातो. एखाद्या दुकानाचे उद्घाटनही ते चालणार की नाही हे पाहून मी जात असतो, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. कार्यकर्त्याला खूष ठेवा, तुम्हाला भाजपाचे आयते मतदान मिळणार आहे, तुमचा विजय निश्चित आहे, असेही शिरसाट यांनी शेवटी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.