Sandipan Bhumre News, Aurangabad
Sandipan Bhumre News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : भुमरेंच्या `नुसता इक्कास`ची अंधारेंनंतर रोहित पवारांकडूनही चिरफाड..

Jagdish Pansare

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रोहयो मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांना घेरण्याची शिवसेना-राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पैठण मतदारसंघात पाठवून अनुक्रमे शिवसंवाद आणि महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने भुमरेंवर हल्लाबोल केला.

त्यानंतर आता राष्ट्रवादीने देखील पैठणवर आपले लक्ष केंद्रित करत भुमरेंना कोंडीत पकडण्याची रणनिती आखली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा काल पैठण तालुक्यातील बालानगर येथे शेतकरी मेळावा पार पडला. (Shivsena) या मेळाव्यात रोहित पवारांनी संदीपान भुमरे यांच्या विकासाच्या दाव्याची अक्षरशः चिरफाडच केली. त्याआधी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी २५ वर्षात भुमरेंनी केलेला विकास अंधारात दिसलाच नाही, असा टोला लगावला होता.

अंबादास दानवे यांनी भुमरेंच्या शरद सहकारी सारखर कारखान्यातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली आहे. महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेने औरंगाबाद जिल्ह्यातील बंडखोर आमदारांचे मतदारसंघ आतापासूनच लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भुमरे, सत्तार, शिरसाट, जैस्वाल यांच्या मतदारसंघात दर आठवड्या- पंधरा दिवसाला मेळावा, सभा असे कार्यक्रम घेतले जात आहेत.

संदीपान भुमरे हे पाचवेळा शिवसेनेच्या तिकीटावर पैठण मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पैकी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात आणि शिंदे सरकारच्या चार महिन्यात ते दोनदा मंत्री देखील झाले. शिवसेनेने भरभरून दिल्यानंतर देखील भुमरेंनी गद्दारी केल्याचा राग पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मनात आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ मध्ये भुमरेंसह बंडखोर ४० आमदारांना धडा शिकवण्याचा निर्धार शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, भकास झालेले संत ज्ञानेश्वर उद्यान यासह अनेक गोष्टी आता चव्हाट्यावर आणल्या जात आहेत.

महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी भुमरे यांच्यावर विकास कामांऐवजी दारूची दुकाने सुरू केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भुमरेंच्या विकासकामाच्या दाव्याची हवा काढून टाकली. पैठण तालुक्यातील रखडलेल्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला भुमरेच जबाबदार असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.

अजित पवार जलसंपदा मंत्री असतांना २००८ मध्ये या योजनेसाठी त्यांनी २१० कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु १४ वर्षात या योजनेचे फक्त २५ टक्के काम झाले. जावयाला गुत्तेदारीचे काम दिल्यामुळेच या योजनचे काम रखडल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. कोट्यावधींची निधी हडप करून त्यांनी शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले.

पैठण एमआयडीसी ओस पडली आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान भकास झाले आहे, पैठणीला बाजारपेठ नाही, या सगळ्याला भुमरे हेच जबाबदार असल्याचेही रोहित पवार म्हणाले. एकंदरित भुमरेंकडून केल्या जाणाऱ्या `नुसता इक्कास`, ची पोलखोल आता विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे भविष्यात भुमरेंना विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना बरीच कसरत करावी लागणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT