नागपूर : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात १४ दिवस होती. या यात्रेने महाराष्ट्रातील लोकांची मने वळवण्याचे काम बऱ्यापैकी केले. राज्याच्या नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतून यात्रेने मार्गक्रमण केले. या दरम्यान लोकांना भावला तो राहुल गांधी यांचा साधेपणा. ही यात्रा देशाच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी ठरू शकते, असा एक मतप्रवाह तयार होत असल्याचे बघायला मिळाले.
महाराष्ट्राने (Maharashtra) मला खूप काही शिकवले, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्राचा निरोप घेताना भावुक होऊन म्हणाले. यात्रेमध्ये सर्वसामान्य लोकांना भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकरी, महिला, तरुण लहान शाळकरी मुलं अशा जास्तीत जास्त लोकांना ते भेटले. दोन लहान भावांना त्यांनी बोलावून घेतले. त्यांच्याशी बोलल्यावर मुले म्हणाली, कॉम्प्यूटर इंजिनिअर व्हायचे आहे. लॅपटॉप आहे का, असे राहुल गांधींनी त्यांना विचारले. उत्तर नाही आले, तेव्हा त्यांनी मुलांना लॅपटॉप भेट दिला. ओवाळणीसाठी आलेल्या महिलांकडून ओवाळून घेतले. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची मुलगी शिवाणी आणि असे बरेच जण होते. तरीही जास्तीत जास्त फोकस त्यांनी सामान्य लोकांवर केला. लोकांशी बोलले, त्यांना वेळ दिला, आस्थेने विचारपूस केली. ही माहिती सोशल मिडियाद्वारे पुढील लोकांना मिळत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक त्यांना भेटण्यास रस्त्याच्या दुतर्फा जमत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना खूप स्वप्नं दाखविले. त्यांची पूर्तता झाली नाही आणि भविष्यात होण्याची शक्यताही नाही. या मतापर्यंत लोक आता आलेले दिसतात. कॉंग्रेस सामान्य माणसाची होती, आहे आणि राहणार. हा संदेश देण्याचा राहुल गांधींचा हेतू स्पष्टपणे दिसला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, संत बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना वंदन करणे, सामान्य लोकांच्या घरात जाऊन बसणे, गप्पा मारणे त्यांच्यासोबत उप्पीड, शिरा, भजे खाणे. या गोष्टींमुळे लोक त्यांच्याशी जुळले. मुळातच येवढा मोठा नेता रस्त्यांवरून फिरतोय, लोकांशी बोलतो हे सामान्य लोकांना भावले.
कॉंग्रेस म्हणजे काहीच उरली नाही, असे चित्र जे निर्माण झालं होतं. ते बदलवण्याचा पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कॉंग्रेसमध्ये नेतेमंडळी मोठी झाली. पण सामान्य कार्यकर्ते मोठे झाले नाहीत. अशोक चव्हाणांनंतर कोण, सुशील शिंदेंनंतर कोण, या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. दुसरी, तिसरी फळी निस्तेज झाली होती. त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. या माहौलचे मतदानात किती परिवर्तन होईल, हे माहिती नाही. पण कॉंग्रेसची हवा निर्माण झाली, येवढे मात्र खरे.
हिंगोलीत राजीव सातव वारले. तेथील लोक स्वतःहून यात्रेत आले. गोरगरीब लोकांची राहुल गांधी बोलले, त्याच्या मुलाखती वाहिन्यांवर आल्या. कॉंग्रेस सामान्य लोकांना गृहीत धरते, ही भावना झाली होती. त्या भावनेला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चेतना जागवण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींचा नातू पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. कॉंग्रेस आहे, पण प्रवाहात नाहीये. हे चित्र त्यांनी बऱ्यापैकी बदलविले. गांधी क्रेझ आहे, हे त्यांनी सिद्ध केले. नेत्यांनी स्वतःचे प्रदर्शन करवून घेतले. पण राहुल गांधींनी सामान्य माणसांना जवळ केले, ते अधोरेखित करण्यासारखे आहे. सामान्यांशी बोलताना त्यांना गॅस, इतर गरजेच्या गोष्टी मिळतात का? मुलं किती आहेत, नोकरी करतात का, जगण्याच्या गोष्टींची पूर्तता होते का, आदी प्रश्न ते विचारत होते. त्यामुळे यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेचा दुसरा टप्पा पूर्व-पश्चिम करण्याचा मानस जयराम रमेश यांनी बोलून दाखविला. तसे झाल्यास ही यात्रा संपूर्ण देशवासीयांचे मन जिंकून घेईल, यात तिळमात्रही शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.