Sugar Factory : संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीच्या विभागीय सहनिबंधक (साखर) यांच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. खंडपीठाने प्रतिवादी सहकार विभागाचे सचिव, विभागीय सहनिबंधक आणि सहकार मंत्री यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. या याचिकांवर १५ डिसेंबर २०२६ ला पुढील सुनावणी होणार आहे.
अनुराधा तुपकरे व इतर १३ संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालावरून विभागीय सहनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्तीबाबत २३ मार्च २०२६ रोजी नोटीस बजावून खुलासा मागविला होता. सचिन घायाळ शुगर प्रा. लि. या कंपनीने सदर कारखाना चालविण्यास घेतला आहे. त्यासाठी बुलढाणा अर्बन सह. क्रेडिट सोसायटीकडून जे कर्ज घेतले, त्याची परतफेड मुदतीत न केल्यामुळे सदर कारखान्यास नुकसानीची शक्यता आहे.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा निर्धारित दर दिला नाही. लेखा परीक्षणातील त्रुटींबाबत सुधारात्मक उपाययोजना केल्या नाहीत, असे आक्षेप घेण्यात आले होते. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ दिलीप पाटील बनकर यांनी युक्तिवाद केला की, कारखान्याच्या नुकसानीची शक्यता काल्पनिक आहे. गेल्या वर्षी ऊसाला निर्धारित दर दिलेला आहे. लेखा परीक्षण अहवाल कारखान्यास सादर केलेलाच नसल्यामुळे सुधारात्मक उपाययोजनांचा प्रश्नच अप्रस्तुत आहे. संस्थेचा अभिप्राय विचारात घेतला नाही, आदी मुद्दे त्यांनी मांडले.
सुनावणीअंती या सर्व मुद्द्यांवर सविस्तर सुनावणी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत, खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. ॲड. बनकर पाटील यांना ॲड. स्वप्नील जोशी, अभिषेक पाटील आणि ओंकार शेंडकर यांनी सहकार्य केले. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. अभिजीत कुलकर्णी यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. ‘सध्या ऊस गाळपाचा हंगाम’ सुरू असताना कारखान्यावर प्रशासक नियुक्ती अप्रस्तुत असल्याचे नमूद करीत खंडपीठाने या याचिकेतही अंतरिम स्थगिती दिली.