Beed News : दोन महिन्यांहून अधिक काळापासून बीडसह राज्य आणि दिल्लीपर्यंतचं राजाकारण हादरवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन 8 मार्चपर्यंत स्थगित केलं आहे.पण आता या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी गंभीर दावा करुन पुन्हा एकदा राजकारण तापवलं आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बुधवारी (ता.26) मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी काही खळबळजनक दावे केले. तसेच तत्कालीन केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहआरोपी करुन त्यांची चौकशी करावी अशीही मागणी सोनवणे यांनी यावेळी केली.
खासदार सोनवणे म्हणाले,संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचं अपहरण झाल्यावर सर्व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते.पण ही देशमुखांची बॉडी आरोपाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाच कशी सापडली? त्यांचा मृतदेह पोलिसांनाच सापडावा हे संशयास्पद आहे. इतकंच नाही तर संतोष देशमुख यांना मारत असताना हा सर्व प्रकार लाईव्ह बघितला जात होता, ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे,असा गौप्यस्फोट करुन सोनवणे यांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
तसेच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. जी स्कॉर्पिओ वाशी येथील पारा चौकात सोडून सहा आरोपी पळून गेले. त्यावेळी केज पोलीस आरोपींचा त्यांचा पाठलाग करत होते. पण वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांआधी मीडियाला मिळतं. हे अगदीच गंभीर होतं. त्याचं सीसीटीव्ही फुटेज मीडियामध्ये पाहायला मिळालं आणि वाशी पोलिस म्हणतात, असे कणी येथून पळूनच गेले नाही. म्हणजे या सर्व आरोपींना पळवून जाण्यासाठी वाशी पोलिसांनीच मदत केली असा गंभीर आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला.
मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात खासदार बजरंग सोनवणे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली. धस आणि सोनवणे यांच्या मध्यस्थीनेच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती मिळालेली नाही. त्यामुळे प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थांनी मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं.
बजरंग सोनवणे म्हणाले,पहिल्या दिवसापासून आपण या घटनेतील सर्व आरोपींच्या फोनची सीडीआर काढून चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे. पण पोलिसांनी अद्यापही आरोपींचे आणि ही प्रकरण वेळेत नोंद न करून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सीडीआर का तपासलेले नाहीत? निवडणुकीत असलेल्या उमेदवाराचे फोन तुम्ही टॅप करतात तर आरोपींचे सीडीआर का नाही काढत? असे खडेबोलही त्यांनी यावेळी सुनावले.
या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो, असंही खासदार सोनवणे यांनी यावेळी म्हणाले, तसेच विषय तीन महिन्यांपासून सुरू आहे, तीन महिन्यांपासून कुटुंब न्याय मागत आहे. न्यायासाठी मायबाप सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं गरजेचं असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलं,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.