Beed, 28 December : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा खळबळनक आरोप केला आहे. देशमुख खून प्रकरणातील फरारी तीन आरोपींचा मर्डर झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी तो आरोप करताना त्यांना आलेल्या व्हाईस मेसेज ऐकवून दाखवला आहे, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने बीडमधील राजकीय नेते आणि गुंडगिरी या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरण आणि या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात अंजली दमानिया यांनी मोहीमच उघडली आहे. वाल्मिक कराडच एकएक कारनामे दमानिया या उघड करत आहेत. काल त्यांनी वाल्मिक कराड याच्याकडील गाड्या आणि पिस्तुलासंदर्भात पुरावे देत आरोप केले होते. आता तर या खून प्रकरणी त्यांनी मोठे भाष्य केले आहे.
अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, मला शुक्रवारी (ता. 28 डिसेंबर) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास मला एका अनोळखी नंबरवरून दोन फोन आले होते. त्यांनी मला व्हॉटस ॲप कालवर या, असे आवाहन केले होते. मात्र, अनोळखी नंबरसाठी माझे ‘व्हॉट्स ॲप’ कॉल सायलेन्स असल्याने मी त्यांना तुमच्याकडील माहिती मला टेक्स्ट मेसेज करा, अशी विनंती केली. त्यांनी मला दोन व्हाईस मेसेज पाठवले होते. मी ते पाहताच त्यांनी ते डिलिट केले.
त्या व्हाईस मेसेजमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, संतोष देशमुख खून प्रकरणातील फरारी तीन आरोपी मिळणार नाहीत, कारण त्यांचा मर्डर झाला आहे. त्यांचे मृतदेह कर्नाटक हद्दीत मिळाले असल्याचे सांगितले. त्याबाबत मला खात्रीशीर माहिती नाही. ही माहिती मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना रात्रीच दिली आहे. त्याची त्यांनी चौकशी केली आहे की नाही, हे मला माहिती नाही. त्यातून काय निष्पन्न झाले आहे, याची माहिती घेण्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे, असेही दमानिया यांनी सांगितले.
यासंदर्भात बीडच्या पोलिस अधीक्षकांनी मला सांगितले आहे की, त्याचे कन्फर्मेशन झालेले नाही. त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर झाला का नाही, याला पोलिस प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही, त्यामुळे दमानिया यांचे आरोप किती तथ्य आहेत, हे चौकशीतूनच पुढे येणार आहे.
दरम्यान, बीडच्या शांतता मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय अंजली दमानिया यांनी घेतला आहे. त्याऐवजी दमानिया आणि त्यांचे सहकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराड अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या दोन गोष्टींसाठी आमचा आग्रह असणार आहे, त्यासाठीच आम्ही हे ठिय्या आंदोलन करत आहोत, असेही सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.