Santosh Deshmukh, Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येचा तपास 'फास्ट ट्रॅक'वर कधी? आता शरद पवारही मैदानात

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घ्यायचं ठरवलं आहे. यासाठी शनिवारी विरोधकांकडून बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील सहभागी होणार आहेत.

Jagdish Patil

Beed News, 25 Dec : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणातील आरोपींना सोडणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं.

मात्र, देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटून गेले तरीही अद्याप मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात विरोधकांनी आधीच पोलिस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत ते आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सीआयडी देखील आरोपींना बेड्या ठोकण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

याच सर्व कारणांमुळे विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घ्यायचं ठरवलं आहे. यासाठीच शनिवारी विरोधकांकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कामात कुचराई केल्याचा आरोप केला आहे. तसंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणीही केली आहे.

बजरंग सोनवणे नेमकं काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, बीडचा बिहार करण्यास राजकारणी जबाबदार आहेत. या जिल्ह्यात सर्वाधिक लोकांकडे रिव्हॉल्वर असून ती देण्यासाठी शिफारस कोणी केली याची चौकशी झाली पाहिजे. बाराशे लोकांनी रिव्हॉल्वर घेतल्याचं सांगितलं जातंय पण त्यापेक्षा दुप्पट लोकांकडे रिव्हॉल्वर असतील.

जेवढे आरोपी गोळीबाराच्या घटनेत पकडले आहेत, त्यांच्याकडे रिव्हॉल्वरचं लायसन्स नव्हतं, असा गंभीर आरोप सोनवणे यांनी केला. तर यावेळी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी करण्याबाबत विविध मागण्या त्यांनी केल्या. ते म्हणाले, "28 आणि 29 नोव्हेंबर रोजी कुणाला बोलावलं होतं आणि बोलावलं होतं याचा तपास करा.

6 डिसेंबर रोजी जी केस झाली, त्याचा सीडीआर काढून त्या प्रकरणी अॅट्रोसिटी का घेतली नाही? हे तपासा. तसंच 9 तारखेला गुन्हा दाखल केला. पण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करायला तीन तास उशीर का केला? पोलिसांना कुणा कुणाचे फोन आले होते? त्याचाही सीडीआर काढा.

पकडलेल्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर तुम्ही काढू शकता ना? सत्तेच्या जोरावर निवडणुकीच्या काळात आमचे मोबाईल ट्रॅकव केले जातात मग आरोपीचे सीडीआर का काढत नाही? असा सवाल करत या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे, त्याचा शोध घ्या आणि आरोपींना फाशी द्या अशी मागणी खासदार सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT