Maharashtra Congress : काँग्रेससमोरचं मोठं आव्हान; प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला भिडणाऱ्या प्रदेशाध्यक्षाचा शोध...
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडून झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षबदलाच्या चर्चेला, तयारीला सुरुवात झाली आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विरुद्ध विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद जगजाहीर होत आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला नागपुरात विधानसभा, विधान परिषद सदस्य व विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करतील. नव्या सरकारला भिडणाऱ्या प्रदेशाध्यक्षाचा शोध यानिमित्तातून घेतला जाऊ लागल्याचे दिसत आहे.
५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदेशाध्यक्ष झालेल्या नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात आपल्याला चार वर्षे झाल्याचे सांगितले. आता या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपध्दतीबद्दल काँग्रेस नेत्यांची कुणकुण अधून-मधून ऐकू येत होती. कधी ही कुणकूण पश्चिम महाराष्ट्रातून असायची तर कधी मराठवाडा अन् विदर्भातून असायची.
लोकसभा निवडणुकीत एका खासदारावरून राज्यातील एक नंबरचा पक्ष अशी कामगिरी झाल्याने ही कुणकूण क्षीण झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने तिचे रुपांतर आता कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात झाले आहे.
निकालानंतर माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या शांततेला मोकळी वाट करून दिली. त्यानंतर दिल्लीतील घडामोडींचा हाच धागा पकडून विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारीही प्रदेशाध्यक्षांवर निश्चित करून टाकली.
... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता लक्ष्य
विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवत काँग्रेसने (Congress) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद-पंचायत समित्या, महापालिका व नगर पालिकांच्या निवडणुकांपूर्वी पक्षसंघटनेत नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यानंतर विजयापेक्षा पराभवाचीच अधिक होणारी चर्चा, महाराष्ट्रातील दारुण पराभव यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचलेला दिसत होता.
काँग्रेसच्या नेतृत्वासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधीच योग्य असल्याची अनेकदा जनमानसांत चर्चा होत होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रियांका गांधी यांनी लोकसभेत मांडलेल्या प्रभावी मुद्यांमुळे, आक्रमक भाषणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसत आहे.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची संधी
अंबादास दानवे यांच्या रुपाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक २० आमदारही याच पक्षाकडे आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील संख्याबळ पाहता काँग्रेसला येथे विरोधी पक्षनेत्याची संधी आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मर्जी व महाविकास आघाडीचा धर्म सांभाळत हे पद काँग्रेसच्या पदरात पाडून घेण्यासाठीही येत्या काळात हालचाली दिसू शकतात.
महाराष्ट्राने पाहिले ६४ वर्षांत २८ प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्रात १९६० ते २०२४ या ६४ वर्षांत काँग्रेसने २८ प्रदेशाध्यक्ष दिले आहेत. त्यामध्ये आबासाहेब खेडकर, विनायकराव पाटील, वसंतदादा पाटील, पी.के.सावंत, नरेंद्र तिडके, नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, प्रेमिलाताई चव्हाण, गुलाबराव पाटील, एसएमआय अमीर, एन.एम.कांबळे, प्रतिभा पाटील, एन. एम. कांबळे, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवाजीराव देशमुख, रणजीत देशमुख, प्रतापराव भोसले, अनंतराव थोपटे, गोविंदराव आदिक, रणजीत देशमुख, प्रभा राव, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी काम पाहिले आहे.
माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना १९९० व १९९३ अशी दोनवेळा संधी मिळाली. शिंदे वगळता एक नेता पुन्हा प्रदेशाध्यक्षपदावर आला नाही. आतापर्यंतच्या ६४ वर्षात काँग्रेसने १३ वर्षे विरोधातील वगळता जवळपास ५१ वर्षे सत्तेत काढली आहेत. सध्या देशात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता नाही.
विरोधात काम करण्याची सवय असलेल्या नेतृत्वाला आता प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्यास काँग्रेसला भविष्यात नक्कीच अच्छे दिन येऊ शकतात. मात्र त्यासाठी आक्रमक अशा नेत्याची निवड त्याला पक्षश्रेष्ठी, प्रस्थापित नेते व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे तेवढेच पाठबळ लाभावे लागेल. एवढ्या मोठ्या प्रदेशात पक्षाचे स्थान पुन्हा पूर्ववत करणे, हे मोठे आव्हान नवनेतृत्वापुढे असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.