Beed Nagarpalika News : बीड नगरपालिकेत जनतेने विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून अजितदादा पवारांकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता दिली. पण केवळ बैठका घ्यायच्या, भाषणं करायची आणि निघून जायचे एवढेच काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. शहरातील कचरा, रस्ते, पाणी, वीज आणि सफाईचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभांना काहीच अर्थ उरत नाही. सत्ताधाऱ्यांना आमचे आवाहन आहे, अजितदादांनी बीड शहराच्या विकासाचे पाहिलले स्वप्न धुळीस मिळवू नका, त्यांचे नाव खराब करू नका, अशी टीका भाजपच्या गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी केली.
नगरपालिका निवडणुकीत बीडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) एकहाती सत्ता दिली. बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जी विकासाची दृष्टी येथील जनतेला दाखवली होती, त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असताना एका दुर्दैवी अपघातात एक आश्वासक चेहरा आम्ही गमावला. लोकांनी मोठ्या आशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सत्ता दिली. पण सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. नुसत्या बैठका, भाषणं या पलीकडे काहीच होत नाही. पहिल्या बैठकीत आम्ही जे विषय मांडले होते, त्यावर एकही पाऊल पुढे टाकले गेले नाही.
पंधराव्या वित्त आयोगाचा निधी आला आहे, त्याचे नियोजन कसे करणार? त्यात कुठली कामे केली जाणार हे आम्ही वारंवार विचारतोय, पण त्यावर काहीही उत्तर दिले जात नाही. शहरातील नाले सफाई जी पावसाळ्यापुर्वी व्हायला हवी होती, ती पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी झालेली नाही. अल निनोचा प्रभाव नसता तर बीडची अवस्था काय झाली असती? याचा विचार न केलेला बरा, असा टोलाही सारिका क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या सुभाष रोडवरच्या नाल्या तुंबल्या आहेत, अशीच अवस्था इतर ठिकाणच्या नाल्यांची आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे होते, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरात डंपिग ग्राऊड उभारायचे आहे, पण याकडेही सत्ताधारी लक्ष द्यायला तयार नाहीत. शहरात चाळीस ठिकाणी हायमस्ट लावण्याचे ठरले आहे. पण त्या संदर्भातही काहीच हालचाली केल्या जात नाहीयेत.
लोकांनी मोठ्या आशेने तुमच्या हातात सत्ता दिली, पण बैठकांचा सोपस्कार पाडून बीडकरांच्या आशेवर पाणी फेरले जात आहे. आम्ही वारंवार मागण्या करतो, बैठकांमध्ये चर्चा करतो, पण त्यातील कोणीतीच गोष्ट पूर्ण केली जात नाही. माझे सत्ताधाऱ्यांना आवाहन आहे, की त्यांनी दिवंगत नेते अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नाव खराब करू नये, याचा पुनरुच्चार सारिका क्षीरसागर यांनी केला.
बीड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. अनेक वर्षांची क्षीरसागर घराण्याची मक्तेदारी मोडीत काढून हा निकाल बीडच्या जनतेने दिल्यामुळे आता शहराचा कायापालट होणार, असा दावा केला जात होता.
बीड नगरपरिषदेच्या 50 जागांपैकी 18 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला. या गटाच्या प्रेमलता पारवे यांनी 3 हजार 779 मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. तर भाजप (BJP) 14 जागांसह विरोधी पक्षात आहे.
निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगली कामगिरी केली, मात्र सत्ता मिळवण्यात त्यांना अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 18, भाजप14, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला11, शिवसेना शिंदे गट 03, एमआयएम 02, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.