Marathwada Graduate Constituency : गेल्या तीन टर्मपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील आपली पकड कायम ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी चौथ्यांदा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने आपल्याला स्पष्ट आदेश दिले आहेत, असे सांगत त्यांनी प्रचारही सुरू केला. तर दुसरीकडे भाजपामध्ये मात्र मतदारसंघ वाट्याला येणार नाही, यातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या संयोजक पदाची जबाबदारी माजी आमदार संजय केनेकर यांच्यावर भाजपाने सोपवली होती. ही जबाबदारी म्हणजेच उमेदवारी,असा अर्थ काढत मराठवाड्यात दोन लाख मतदारांची नोंद केल्याचा दावा केनेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
एवढेच नाही तर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी भाजपाच्याच उमेदवाराला पाडण्यासाठी कशी ताकद लावली होती, याची आठवण देखील करून दिली. पण त्यांची ही नाराजी अन् मराठवाडा पदवीधर मतदारसंघावरील दाव्याची दखल मात्र पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात नाहीये.
गणेशोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले असले तरी केनेकरांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीचा प्रसाद मात्र अद्याप मिळालेला नाही. दोन लाख मतदारांची नोंदणी केली, प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याची इच्छा हा मतदारसंघ आपण लढावा, अशीच आहे असेही केनेकर वारंवार सांगत आहेत.
हा मतदारसंघ तीनवेळा जिंकलेल्या राष्ट्रवादीची दावेदारी इतकी पक्की आहे, की भाजपाच्या नेतृत्वाला महायुतीचा विचार करून ही जागा त्यांनाच सोडावी लागणार, अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने सतीश चव्हाण यांनी मराठवाडा मतदारसंघाचा दौरा आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, त्या पाहता चौथ्यांदा त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले, असेच संकेत मिळत आहेत.
मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाहीच?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि त्यांनतर महाविकास आघाडी अशीच लढत कायम झालेली आहे. 2008 पूर्वी भाजपाची या मतदारसंघावर मजबूत पकड होती. जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतू त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जागा भाजपकडून खेचून घेतली.
श्रीकांत जोशी, शिरीष बोराळकर यांचा पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तीनेवळा या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. मराठवाड्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये चव्हाण यांच्याबद्दल नाराजी असली तरी महायुती म्हणून त्यांना ती बाजूला ठेवावी लागणार आहे. शिवाय यापुर्वीच्या तीनही निवडणुकीत सतीश चव्हाण हे भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करूनच निवडून आले, असल्यामुळे ते स्वबळावर ही निवडणूक जिंकू शकता, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.