Abdul Sattar-Raosaheb Danve
Abdul Sattar-Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

सत्तार, दानवेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; पाच हजार भाजप कार्यकर्ते शिवसेनेत आणणार

Jagdish Pansare

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या सोयगांव नगरपंचायतीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता मिळवत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना धक्का दिला. १७ पैकी ११ जागा जिंकत सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजपला सत्तेतून खेचले. (Bjp) कसेबसे सहा नगरेसवक निवडून आले, पण भाजपला ते देखील राखता आले नाही. यापैकी चार नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले, तर उर्वरित दोन देखील वाटेवर आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत शिवसेनेला (Shivsena) विरोधकच उरणार नाही अशी परिस्थिती आहे.

आता यानंतर अब्दुल सत्तार रावसाहेब दानवे यांना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मतदारसंघातून भाजपचा सुपडासाफ करणार असा निर्धार करत लवकरच भाजपचे पाच हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे. शिवजेत मोहिमेची सुरूवात सिल्लोडमधून करण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी हा दावा केला.

अब्दुल सत्तार म्हणाले, सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड ठाण मांडून बसले होते. पण सोयगांवच्या जनतेने शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विकासाच्या नेतृत्वाला पंसती दर्शवत शिवसेनेच्या झोळीत भरभरून मतदान दिले. नगरपंचायतीवर भगवा फडकल्यानंतर आता भाजपचे अनेकजण संपर्कात असून सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील ५ हजार पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विधानसभा मतदारसंघात कमळाबाईचा बंदोबस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आव्हानच सत्तार यांनी भाजपला दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव संपताच हा प्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा देखील सत्तार यांनी आपल्या भाषणात केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यप्रणाली व शिवसेनेवरील लोकांचा विश्वास यामुळे शिवसेना लवकरच क्रमांक एकचा पक्ष होईल.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मूलमंत्र घेऊन शिवसेनेचा विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी, सामान्यांसाठी घेतलेले जनहितार्थ निर्णय घराघरात पोहचवत आहोत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी एक मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठावे, असे अवाहनही सत्तार यांनी यावेळी केले.

सोयगाव नगर पंचायत निवडणुक व त्यानंतर युवासेनाप्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने मतदारसंघ भगवामय झाला असल्याने येत्या जि. प. , पं. स.निवडणुकीत मतदार संघातील सर्वच जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास देखील सत्तार यांनी उपस्थितांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT