Dr.Bhagwat Karad
Dr.Bhagwat Karad Sarkarnama
मराठवाडा

हवामान बदलातील अचूक माहिती देणारे सी बँड रडार औरंगाबादेत बसवणार

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः औरंगाबाद येथे सी बँड रडार डॉपलर बसविण्यास संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून सी बँड डॉपलर रडार संदर्भात आग्रही मागणी केली होती.

या रडारच्या माध्यमातून हवामाना बद्दलची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादेत सी बँड डॉपलर रडार बसवण्यास संदर्भात नुकतीच मान्यता दिली असल्याचे पत्र दिले आहे.

भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून सी बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी बँड डॉपलर रडार निभावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा भूभाग किंवा परिघ या रडारच्या नियंत्रणात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

परिणामी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संदर्भात अचूक माहिती या रडारच्या माध्यमातून मिळणार आहे. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद हे जिल्हे पर्यावरणीय बदल, हवामान आणि तापमान वाढ या संदर्भात संवेदनशील असल्याचे टेरीच्या अहवालामध्ये नमूद केले आहे.

सातत्याने हवामान तसेच वातावरणातील बदलाचा फटका बसून, मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट दशकभरापासून निर्माण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे. दशकभरात नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

या संदर्भातही हवामानातील बदल आणि आर्थिक नैराश्य ही कारणे अनेक अहवालामध्ये स्पष्ट केली आहेत. मराठवाडा भागामध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. केंद्र आणि राज्य सरकारने दहा वर्षांमध्ये किमान दहा हजार कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुदानावर खर्च केली आहे.

या सर्व परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथील सी बँड डॉपलर रडार हे फायदेशीर राहणार आहे. डॉ. भागवत कराड केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांना मिळालेले यश म्हणजे मराठवाड्यातील शेतीसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT