Local Body Election News : भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर मध्ये नुकतीच बैठक झाली. सदस्य नोंदणीसह आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढता येईल का? याची चाचपणीही यावेळी करण्यात आली. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासून महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितल्यामुळे महायुतीत काहीसा नाराजीचा सूर उमटत आहे. शिवसेनेने सामंजस्य दाखवत एमआयएमला रोखण्यासाठी एकत्र लढण्याची भूमिका घेतली. पण स्थानिक नेते स्वबळावर ठाम आहेत.
या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आलेले भाजपाचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी आगामी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका महायुती एकत्रित लढणार असल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीनेच आमची बोलणी सुरू असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून स्वबळाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. शहरात दीड लाख नवे सदस्य जोडण्याचा भाजपाचा संकल्प आहे.
विशेषतः शिवसेनेचे मंत्री, आमदार असलेल्या शहरातील पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. (BJP) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात तब्बल 64 हजार सदस्य नोंदणीचे टारगेट ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले व त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर आणखी दहा ते बारा माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट भाजपला वरचढ ठरल्याचे चित्र आहे. खासदार शिवसेनेचा आणि जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदारही त्यांचेच असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे गटाचा वरचष्मा आहे. अशावेळी भाजपाला महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढून आपली ताकद वाढवायची आहे. त्यामुळे भाजपाचे काही नेते हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती एकत्र लढणार असे सांगत आहेत, तर दुसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारीही करत आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांसमोर एमआयएमचे तगडे आव्हान असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर लढले तर याचा थेट फायदा एमआयएमला होऊ शकतो. अर्थात अद्याप महापालिका निवडणूकीची घोषणा झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयातील सुनवाणी पुढे ढकल्यामुळे या निवडणुका देखील लांबण्याची शक्यता आहे. तयारी मात्र सगळ्याच पक्षांनी आतापासून सुरु केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.