Sharad Pawar Visit Massajog News Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Visit Massajog : दहशतीतून बाहेर पडा, सगळे मिळून परिस्थितीला तोंड देऊ..

Sharad Pawar meet the Deshmukh family : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच शरद पवार यांनी आज मस्साजोग येथे भेट देत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

Jagdish Pansare

बीड : पंधरा वर्ष गावात सरपंच म्हणून काम करणाऱ्या तरुणाची अशा प्रकारे झालेली हत्या महाराष्ट्रातील (Beed News) बीड जिल्ह्याला शोभणारी नाही. या घटनेमुळे मस्साजोग गावात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, कृपा करुन या दहशतीमधून बाहेर पडा. या सगळ्या परिस्थितीला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

राज्य सरकारने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला दहा लाखाची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीने गेलेला व्यक्ती परत येणार नाही, पण यावर मी अधिक बोलणार नाही. या कुटुंबातील लहान मुलगा, मुलगी यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्या बारामतीमध्ये आमच्या शाळेत दहा हजार मुली शिक्षण घेतात त्यात आणखी एक असे म्हणत या घरातील मुला-मुलीच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी आम्ही घेत असल्याचे (Sharad Pawar) शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच शरद पवार यांनी आज मस्साजोग येथे भेट देत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे यावेळी त्यांच्यासोबत होते. देशमुख कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी घटनेचा अधिक तपशील जाणून घेतला. त्यानंतर दहशतीच्या वातावरणात वावरत असलेल्या मस्साजोग येथील नागरीक आणि माध्यमांशी पवारांनी संवाद साधला.

या कठीण काळात केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व राज्यातील जनता गावकरी आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज आहे. या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे. मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे, ते दु:खी आहेत, आपण त्यांच्यासोबत आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले.

गावातील आणि जिल्ह्यातील दहशतीचे वातावरण पाहता यातून आपण आता बाहेर पडलं पाहिजे. या घटनेच्या खोलात जाऊन आरोपी व त्यांच्या सुत्रधाराला शिक्षा मिळावी यासाठी आपण सामुहिक प्रयत्न करू, मग आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थितांना दिला. लोकसभेत तुमच्या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, निलेश लंके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा लोकसभेत लावून धरला. दोघांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली.

त्यानंतर अनेकांनी महाराष्ट्रात काय घडतंय याची माहिती घेतली. इकडे राज्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी जातीचा विचार न करता सभागृहात भूमिका मांडल्याचे शरद पवार म्हणाले. या प्रकरणात जो काही सुसंवाद झालाय, त्याच्या खोलात गेले पाहिजे, मग तो मोबाईलवरील सुसंवाद असो, किंवा अन्य काही असो, याची माहिती काढली पाहिजे, खोलात गेले पाहिजे, तेव्हा वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल, असेही शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT