Shivsena News : तीन वर्षापुर्वी शिवसेनेत फूड पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार पक्ष सोडून गेले. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही शिवसेनेमधून विस्तवही जात नाही. गद्दार, पन्नास खोकेचा शिक्का या सर्व पक्षातून फुटून गेलेल्या नेते, आमदार, मंत्र्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मारला. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप केला.
गेल्या तीन वर्षापासून हा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू असला तरी आता स्थानिक पातळीवर तडजोडी करून सत्ता मिळवण्याचे धोरण शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी स्वीकारले आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात हा चमत्कार घडला आहे. सोयगाव खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेने एकत्र येत पॅनल दिले आणि 17 पैकी 13 जागा जिंकत सत्ता मिळवली.
या विजयानंतर आज सोयगावमध्ये दोन्ही शिवसेनेच्या वतीने आभारसभा आणि स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे फोटो झळकवण्यात आले होते. तर तर अब्दुल सत्तार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी हातात हात घेत या आभार सभेला हजेरी लावत सभासदांसोबत स्नेह भोजनही घेतले.
एकूणच काय तर राज्य, जिल्हा पातळीवर कितीही टोकाचे मतभेद असले तर स्थानिक, गावपातळीवर सत्तेसाठी एकमेकांशी जुळवून घेण्याचे धोरण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्वीकारल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार हे अवघ्या 2420 मतांनी निवडून आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांनी सत्तार यांना चांगलाच घाम फोडला होता. सलग विजयाची हॅट्रीक केलेल्या सत्तार यांच्यासाठी चौथा विजय परीक्षा पाहणारा ठरला.
शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र राठोड आणि अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री खूप जुनी आहे. पक्ष फुटल्यानंतरही या दोन नेत्यांमधील एकमेकांबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही हेच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील युतीने स्पष्ट झाले. राठोड यांच्या प्रस्तावाला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याने सत्तार यांच्या विरोधात वातावरण असताना त्यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनलला 17 पैकी 13 जागा जिंकता आल्या. तर चार जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.