Marathwada Political News : शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार सध्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. निवडणुकीत पराभवाच्या दारातून कसबसे परतलेल्या सत्तार यांना घडलेले मताधिक्य चांगलेच जिव्हारी लागले. प्रचारा दरम्यान, एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या सत्तारांचा अवघ्या 2420 मतांनी विजय झाला. मताधिक्य घटल्यामुळे उद्विग्न झालेल्या सत्तार यांनी आता आपण पुढील विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले आहे.
सिल्लोड-सोयगाव या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विजय मिळवला. दरम्यानच्या काळात राज्यातील आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये अब्दुल सत्तार तीनवेळा मंत्रीही झाले. कृषीसारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्री पद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला होता. सत्तार यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्दही वादळी आणि वादग्रस्त राहिलेली आहे. परंतु मतदारसंघावर असलेली मजबूत पकड त्यांना रोखू शकली नाही. 'सत्ता तिथे मी' हे सत्तार यांनी कायम खरे करून दाखवले.
पण राजकारणात परिस्थिती कधी बदलेल याचा काही नेम नाही आणि सत्तार यांच्याबाबतीत हे खरे ठरले. महायुती सरकारमध्ये असलेले मंत्री पद नव्या सरकारमध्ये गेले. (Shiv Sena) मतदारसंघावरील पकड ढिली झाली, लाखाच्या मताधिक्यांचा दावा केला, पण विजय मिळवतानाच त्यांची दमछाक झाली. प्रत्येकवेळी पडद्यामागून मिळणारी मदत आणि मैत्री तुटल्याने सत्तार यावेळी अडचणीत आले. संपूर्ण मतदारसंघात कधी नव्हे तो इतका टोकाचा विरोध प्रचारा दरम्यान त्यांना झाला.
भाजपाने सुरेश बनकर या आपल्या जुन्याच मोहऱ्याला उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पाठवून उमेदवार म्हणून मैदानात उतरवले. त्यांच्यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रामाणिकपणे राबवली, मतदारसंघातील वारे फिरले आणि बनकर निवडून येणार, अशी परिस्थिती आणि दावे केले गेले. मतदान होऊन प्रत्यक्ष मतमोजणी झाली तेव्हा शेवटच्या फेरीपर्यंत बनकर यांनी आपली आघाडी कायम राखली आणि ते आमदार होणार असे वाटत असताना निकालाला कलाटणी मिळाली. सत्तार 2420 मतांनी विजयी झाले.
या विजयावर शंका उपस्थित केल्या गेल्या, न्यायालयात धाव घेतली गेली. पण शेवटी विजय हा विजय असतो त्या प्रमाणे सत्तार पुन्हा मतदारसंघात कामाला लागले. सुरुवातीचे काही महिने लोकांना आपल्याला का नाकारले? याचे आत्मचिंतन सत्तार व त्यांच्या समर्थकांकडून सुरू होते. मंत्रीपद गेले, अनेक मंजूर प्रकल्पांना कात्री लागली, सिंचनाच्या योजना, एमआयडीसी सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प धोक्यात आल्याने सत्तार यांनी निराशा झटकून पुन्हा मतदारसंघावर पकड मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मतदारसंघाशी सत्तार यांचा कायम संपर्क होताच, पण आता त्यात कुठलीही कमतरता राहू नये, याची काळजी घेत पायाला भिंगली लावल्याप्रमाणे ते गाव, वाड्या, वस्त्या, तांडे पालथे घालत आहेत. विरोधकांनी केलेली कोंडी फोडण्यासाठी सर्वधर्मीयांच्या कार्यक्रम, उत्सव, धार्मिक सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावत सत्तार गमावलेले जनमत पुन्हा मिळवण्यासाठी झटताना दिसत आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीत विरोधकांकडून सत्तारांना घेरण्याचा आणि त्यांची सत्ता उखडून फेकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशावेळी नगर परिषदेतील एकहाती सत्ता राखत पुढच्या विधानसभा निवडणुकीत मजबुतीने उभे राहण्याच्या दृष्टीने सत्तार फिल्डींग लावत आहेत. मतदारसंघात प्रभाव कायम राखण्यासाठी नगरपरिषद ताब्यात असणे महत्वाचे आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून सत्तार यांचीच इथे सत्ता आहे. या सत्तेला सुरूंग लागला तर मात्र त्यांच्या अडचणी वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर सत्तार आतापासूनच अलर्ट झाले आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.