Arjun Khotkar- Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar News : कपटी लोकांचा सत्यानाश झाला, रावसाहेब दानवेंवर 'अर्जुनास्त्र' धडकले !

Arjun Khotkar Vs Raosaheb Danve : पाच वर्षापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटत निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

Jagdish Pansare

Jalna News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. राज्यात महायुती असूनही जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी रावसाहेब दानवे यांचे काम केले नाही, असा आरोप केला गेला. त्यात शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव प्रामुख्याने समोर आले होते. या संदर्भातील काही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात झालेल्या आढावा बैठकीत पुन्हा एकदा अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आपला असलेला राग अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केला.

ज्यांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला, अशा शब्दात खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर हल्ला चढवला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला सावध राहावे लागे, असे सांगत खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांचा पलटवार परतवून लावण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

पाच वर्षापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटत निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र महायुती असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलून अर्जुन खोतकर यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी विधानसभेला खोतकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी आणि शब्द दिला होता.

मात्र लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना मदत करण्याऐवजी त्यांना पाडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. रावसाहेब दानवे यांनी विधानसभेला शब्द पाळला नाही त्यामुळे खोतकर यांना पाच वर्ष आमदारकी शिवाय राहावे लागले. याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणात खोतकर यांना कसे मागे लोटता येईल याचे प्रयत्न सातत्याने मंत्री राहिलेल्या दानवे यांनी केल्याचा खोतकर समर्थकांचा आरोप आजही कायम आहे.

याशिवाय रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्री प्रकरणात खोतकर यांच्या मागे लागलेल्या ईडीची पीडा हे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचेच कारस्थान होते, असा जाहीर आरोपही खोतकर यांनी याआधी केलेला आहे. सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या रावसाहेब दानवे यांचा 2024 मध्ये मात्र काँग्रेस महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांनी तब्बल 1 लाख 9 हजार मतांनी पराभव केला.

या पराभवात अर्जुन खोतकर यांचाही वाटा होता असे बोलले जाते. दानवे यांच्या पराभवानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अर्जुन खोतकर पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत खोतकर जालना मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी त्यांची लढत होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेला आपला रोष अप्रत्यक्षरीत्या व्यक्त करत विधान सभा निवडणुकीत सावधानता बाळगण्याचा सल्ला शिवसैनिकांना दिला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT