Senior Shiv Sena and BJP leaders hold crucial meetings to finalize Zilla Parishad election seat sharing, leaving key disputed seats for state leadership intervention. Sarkarnama
मराठवाडा

Shivsena-BJP : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी शिवसेना-भाजपची लंगडी युती; 11 जागांचा निर्णय फडणवीस, शिंदेंच्या कोर्टात

Zilla Parishad Elections Alliance : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये 63 पैकी 52 जागांवर एकमत झाले असून उर्वरित 11 जागांचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar ZP Election News : महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत तानातानी झाल्यानंतर स्वबळावर लढलेल्या शिवसेना-भाजपने जिल्हा परिषदेसाठी मात्र जुळवून घेतले आहे. 63 पैकी 52 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून भाजप 27 तर शिवसेना 25 जागांवर लढणार आहे. दोन दिवसांपासून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. अखेर आज युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी 11 जागांचा तिढा कायम आहे. परंतु त्यावर अडून न बसता हा निर्णय राज्य पातळीवरील नेतृत्वावर सोडून स्थानिक नेत्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

युतीचा निर्णय झाल्यानंतर वैजापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र शिवसेनेसोबतची युती तोडा, अशा घोषणा देत मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या गाडीसमोर गोंधळ घातला. त्यामुळे युती झाली असली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची इच्छा होती, हे दिसून आले. पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, भागवत कराड, आमदार संजय केनेकर, विलास भुमरे, रमेश बोरनारे, संजना जाधव यांच्या उपस्थितीत काल पासून बैठका सुरू होत्या.

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक सदस्यांसह भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. भाजपचे 23 तर शिवसेनेचे 18 सदस्य निवडून आले होते. महापालिका निवडणुकीत युती तुटल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा परिषदेत तडजोड करा, पण युती करा, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दोन्ही प्रमुख नेत्यांनी दिल्या होत्या. काल दुपारपासून ते आज सायंकाळपर्यंत तीन ते चार बैठका पार पडल्या.

अखेर यात दोन्ही पक्षांचे 63 पैकी 52 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित 11 जागांचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणल्यानंतर ते जिल्हा परिषद निवडणूकही स्वबळावर लढतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

काल भाजपच्या विभागीय कार्यालयात कार्यकर्त्यांनी युती नको, अशी भूमिका नेत्यांसमोर मांडली होती. परंतु राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून युती करण्याच्या सूचना आल्यामुळे महापालिकेला झाला तसा गोंधळ टाळत वादाच्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सोडून एकमत झालेल्या जांगावर युती जाहीर करण्यात आली आहे.

अब्दुल सत्तार गैरहजर..

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे युतीसाठीच्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. उलट त्यांनी सिल्लोड-सोयगाव या मतदारसंघात आपण स्वतंत्र लढणार आहोत, असे जाहीर केले. या शिवाय कन्नडच्या आमदार संजना जाधव यांची आणि आपली भेट झाली. या भेटीत आम्ही दोघांनी स्वतंत्र लढण्यासंदर्भात चर्चा केली. मी माझ्या मतदारसंघात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. संजना जाधव यांचा निर्णय त्या घेतील, असे स्पष्ट केले होते. युतीच्या बैठकीला आमदार संजना जाधव या हजर होत्या. त्यामुळे त्या युतीतच लढणार, असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT