Raosaheb Danve, Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar News : विरोधकांना मान अन् मित्रपक्षाचा अपमान? खोतकरांनी लावला नाराजीचा सूर...

Jagdish Pansare

Jalna News : लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तत्पुर्वी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात विविध विकासकामांची उद्घाटने, भुमिपुजने सुरू होती. या कार्यक्रमात महायुतीतील मित्रपक्षांपेक्षा विरोधकांनाच अधिक मान देण्यात आला. आमच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले, असा नाराजीचा सूर शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar News) यांनी काढला आहे.

काँग्रेसचे (Congress) आमदार कैलास गोरंट्याल यांना दानवेंकडून प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेतले जाते, दुसरीकडे राज्यात महायुती (Mahayuti) असूनही आमच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिकेत नावं न टाकणे, त्यांना कार्यक्रमाला न बोलवणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळेच मी काही कार्यक्रमांना न जाता याबद्दल योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केल्याचे अर्जून खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, हे लक्षात ठेवून रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटन, भूमिपुजनाचा धडाका लावला होता. काही कार्यक्रमांना खोतकर यांनी हजेरी लावत रावसाहेब दानवे यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाहीही दिली. नंतर आमच्याकडेही लक्ष द्या, असा चिमटाही खोतकरांनी काढला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या (Shiv Sena) स्थानिक पदाधिकाऱ्यांना रावसाहेब दानवे आणि भाजपकडून डावलले जात असल्याबद्दल खोतकरांनी नाराजी व्यक्त केली. मी विशेष प्रयत्न करून राज्य शासनाकडून जालना शहरातील विविध विकास कामांसाठी 109 कोटींचा निधी आणल्याचा दावा खोतकरांनी केला. तसेच दोन दिवसापूर्वी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झालेल्या काही कार्यक्रमाना जाणे टाळले. याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती.

यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रिकेत नामोल्लेख टाळल्याबाबत नाराजी व्यक्त केली. विकास कामांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षातील पदाधिकारी यांना बोलावले जाते. आम्ही महायुतीत असताना पदाधिकाऱ्यांना डावलले जाते, हे चुकीचे आहे. या संदर्भात आम्ही योग्य ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे.

काही कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकत त्यांनी माझे नाव टाकले. मात्र आमच्या पदाधिकाऱ्याना डावलले, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही. आमदार कैलाश गोरंट्याल यांनी खोतकरांवर त्यांनी जालन्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, असा आरोप केला होता. त्याबद्दल विचारले असता मी लहान लेकरांच्या नादी लागत नाही, असा टोला खोतकरांनी लगावला. 

मागच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले होते, यावेळी काय? या प्रश्नावर आता आमची युती आहे, तेव्हा आमचे नेते एकनाथ शिंदे म्हणतील, त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो, असे सांगत खोतकरांनी दानवे यांच्यासाठीच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT