Raosaheb Danve Vs Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Politics : अर्जुन खोतकरांच्या पोटातलं ओठावरं आलंच, म्हणाले, 'दानवेंना उमेदवारी मिळाली नाही तर आनंदच...'

Jagdish Pansare

Jalna News : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, अशावेळी जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्ष एकमेकांना विरोध करणारेच एकत्र आले. राज्यातील महायुतीतल्या शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते माजी मंत्री अर्जून खोतकर आणि भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कट्टर विरोधक आता गळ्यात गळे घाऊन फिरत आहेत. जिल्ह्यातील एका विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त या दोन नेत्यांमधील जुगलबंदीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

लोकसभेची उमेदवारी मलाही मिळते की नाही, हे अजून माहित नाही, आमच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाची पार्लामेंटरी बोर्ड घेते हे नेहमीचे वाक्य दानवे गेल्या काही दिवसांपासून बोलत आहे. शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आपल्या भाषणात दानवेंच्या याच वाक्याचा आधार घेत आपल्या पोटातील ओठावर आणले. रावसाहेब दानवे तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, तर आम्हाला आनंदच होईल. पण तो आनंद तुम्ही आम्हाला मिळूच देत नाही. आता आम्ही तुमच्यासोबतच आहोत, तुम्हाला निवडून आणण्यासाठी काम करू, अशी सारवासारवही खोतकरांनी केली.

या कार्यक्रमातील उपस्थितांनी अर्जुन खोतकरांना दाद देत नेमकं त्यांच्या मनात काय आहे? हे हेरलंच. त्याला हजरजबाबी दानवे यांनीही आपल्या भाषणातून उत्तर दिले. मला तिकीट मिळणार आहे की नाही? हे माहित नाही, पण खोतकर तुम्हीच आता माझ्या नावाची घोषणा करुन टाकली. तेव्हा तुमच्या तोंडात साखर पडो, असा चिमटा काढत आता काही गडबड करू नका, असा सूचक संदेशही दिला. जालना जिल्ह्याचे राजकारण आतापर्यंत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) -खोतकर यांच्याभोवतीच फिरत राहिले आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युती असतानाही या दोन नेत्यामध्ये जिल्ह्यात कायम खडके उडायचे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत खोतकरांनी दानवे यांना अजूनही शिरकाव करु दिलेला नाही. जिल्हा परिषद, नगरपरिषद, जिल्हा बॅंकेसह जिल्ह्यातील सगळी सत्ता केंद्र आणि त्याचे वाटप सगळ्या पक्षाचे राजकीय नेते समसमान वाटप करून घेतात. स्थानिक पातळीवर एकत्र असलेले हे नेते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मात्र आपले खरे रंग दाखवायला सुरवात करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्याची घोषणा करत तयारी सुरू केली होती. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अब्दुल सत्तार यांचीही भक्कम साथ खोतकरांना मिळाली होती. पण युती असल्यामुळे दानवे यांनी खोतकरांची खेळी उलटवून लावत त्यांना माघार घ्यायला भाग पाडले होते. अगदी देवेंद्र फडणवीसांमार्फत उद्धव ठाकरे यांच्याकडे शिष्टाई करत छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या युतीच्या मेळाव्यातच खोतकरांना माघार घेतल्याचे जाहीर करावे लागले होते.

रावसाहेब दानवे सलग पाचव्यांदा लोकसभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून गेले. लोकसभा निवडणकीच्या प्रचारा दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी खोतकरांनी केलेल्या मदतीची परतफेड दुपटीने करण्याचा शब्द दिला होता. पण प्रत्यक्षात जालना विधानसभा मतदारसंघातून अर्जून खोतकर पराभूत झाले.

काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी विजय मिळवला आणि खोतकर गेल्या पाच वर्षापासून माजी मंत्री म्हणून वावरत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडापासून लांब राहिलेल्या खोतकरांविरुद्ध `ईडी अस्त्रा`चा वापर झाला आणि त्यांनी जड पावलांनी शिंदेच्या शिवसेनेचा रस्ता धरला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT