Aaditya Thackeray leading a torch rally to launch Shiv Sena (UBT) campaign after Shiv Sena–MNS alliance announcement in Chhatrapati Sambhajinagar municipal elections. Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray: शिवसेना-मनसे युतीची घोषणा; आदित्य ठाकरे फोडणार संभाजीनगरमध्ये प्रचाराचा नारळ

Sambhajinagar municipal election : शिवसेना-मनसे युतीनंतर आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मशाल रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करत शिवसेना मैदानात उतरणार आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिकच गळती लागली. एकापाठोपाठ पदाधिकारी, माजी महापौर, नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत. अशातच आज मुंबईत राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली. त्यानंतर संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते येत्या 26 रोजी फोडला जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शहरात मशाल रॅली काढून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मैदानात उतरणार आहे. शुक्रवारी (ता. 26) शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मशाल फेरी काढली जाणार असून, त्यानंतर संस्थान गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ आदित्य ठाकरे फोडणार आहेत.

गेली पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर पक्ष फुटीनंतर भगवा फडकवण्याचे मोठे आव्हान ठाकरेंवर असणार आहे. पक्षाला गळती लागली असली तर महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची गर्दी मात्र कमी झालेली नाही. एका एका प्रभागात दहा ते पंधरा इच्छुकांनी मुलाखती दिल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले आहेत. त्यामुळे उत्साहाचे वातावरण मुंबईसह राज्यात असल्याचे बोलले जाते.

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-मनसे युतीची घोषणा झाली असली तरी इतर ठिकाणी काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. मनसे संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुक लढवणार नसल्याचे समजते. त्यामुळे मनसेच्या जिल्हाध्यक्षासह दोन शहरप्रमुख आजच पक्ष सोडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर 26 रोजी आदित्य ठाकरे यांच्याकडून संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडका सुरू होणार आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराने महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून देत इतिहास घडवला होता. पंचवीस वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवल्यानंतर आता पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे जिथून बाळासाहेबांनी शहरात शिवसेनेच्या राजकीय वाटचालीला सुरवात केली होती, तशीच सुरवात नव्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना करावी लागणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातर्फे महापालिका निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी प्रचाराचा नारळ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी फोडला जाणार आहे. क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत निघणाऱ्या मशाल फेरीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, उपनेते सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 5 वाजता 29 प्रभागांमध्ये 61 मशालींसह पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारातर्फे मशाल फेरी काढली जाणार आहे. क्रांती चौक ते सिल्लेखाना, पैठण गेट गुलमंडीवर गेल्यानंतर ठाकरे यांची सभा होईल.

उद्धव ठाकरेंची सभा होणार..

मुंबई महापालिकेप्रमाणेच शिवसेनेसाठी छत्रपती संभाजीनगरची महापालिकाही महत्वाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही 10 जानेवारी रोजी संभाजीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे. आता ही सभा एकटे उद्धव ठाकरे घेणार की मग राज ठाकरेही येणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT