

Nagpur Election News : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झाला आहे. आता मुंबई आपलीच अशा घोषणा दिल्या जात आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये उशीर झाला, परंतु `देर आये दुरुस्त आये अशा प्रतिक्रिया उद्धवसैनिक आणि मनसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या नागपूरमध्ये मनसे जवळपास संपली आहे तर उद्धव सेना अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. दोन्ही सेनेचे मिळून फक्त दोनच नगरसेवक असल्याने ठाकरे बंधूंच्या युतीचा फारकाही राजकीय फायदा महापालिकेच्या निवडणुकीत होईल असे चित्र नागपूरमध्ये नाही.
शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. त्यानंतर प्रथमच मनसेने 2007 साली नागपूर महापालिकेची निवडणूक लढली होती. यात निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. ही संख्या 2012 च्या निवडणुकीतही कायम राहिली. त्यानंतर मात्र मनसेला गळती लागली. तीन ते साडेतीन हजार मते घेऊनही मनसेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.
भाजपसोबत युती तुटल्यानंतर उद्धव सेनेचाही ग्राफ खाली घसरला. सहा ते आठ नगरसेवकांची शिवसेना दोनवर येऊन थांबली. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. आठ ते दहा नगरसेवकांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. या दरम्यान शिवसेनेत नवीन लोकांचा भरणा झाला. काँग्रेसच्या दुष्यंत चतुर्वेदी यांना उद्धव सेनेने विधान परिषदेवर पाठवले. त्यांना नागपूरचे संपर्क प्रमुख केले. त्यामुळे निष्ठावंत आणि उपरे असे दोन गट शिवसेनेत पडले. हा वाद आजही कायम आहे.
नागपूरमध्ये दोन जिल्हा प्रमुख आहे. मात्र ते एकमेकांच्या बैठकांना कार्यक्रमांना जात नाही. उद्धव सेनेच्या हक्काचा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघही काँग्रेसने (Congress) हिरावून घेतला. दुसरीकडे राज ठाकरे यांनी संपूर्ण विधानसभा लढण्याची घोषणा केली मात्र शेवटच्या क्षणी सर्व उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्याचा राग आणि असंतोष आजही मनसैनिकांमध्ये आहे.
नव्यांना संधी द्यायची असे सांगून राज ठाकरे यांनी युवा शिलेदारांची नेमणूक केली. त्यांना पदे दिली. त्यामुळे मनसेतील निष्ठवंत दुखावले. आज अनेकजण घरी बसून तमाशा बघत आहे. आज नागपूर शहरात मनसे फक्त नावालाच उरली आहे तर उद्धव सेना अस्तित्वासाठी धडपड करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आले आहे. याचा आनंद दोन्हीकडच्या सैनिकांना आहे. मात्र त्याचा राजकीय फायदा होईल असे चित्र नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.