Aaditya Thackeray Trigger Sarkarnama
मराठवाडा

Aaditya Thackeray Maharashtra Drought : ‘ट्रिगर 1, 2, 3 किती?’ दुष्काळावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीस सरकारला सवाल

Aaditya Thackeray questions the Maharashtra government over drought relief and Trigger-1 implementation : महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; मदतीच्या अंमलबजावणीवरून सरकारला प्रश्न

Pradeep Pendhare

Maharashtra drought news : राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 36 पैकी 32 जिल्ह्यांतील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना ‘ट्रिगर’ हा शब्दप्रयोग केला. याच शब्दाचा आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टोलेबाजी केली आहे.

‘ट्रिगर काय आहे? काय नाटक चाललं आहे? दुष्काळ दिसतोय. निवडणुकीत जाऊन घरोघरी जशी मदत मागता, तशी मदत करा. ट्रिगर 1, 2, 3 किती ट्रिगर?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी जालना जिल्ह्यातील दुष्काळस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुष्काळ, शेतकरी कर्जमाफी, शैक्षणिक शुल्क आणि सरकारच्या मदत उपाययोजनांवरून प्रश्न उपस्थित केले.

दुष्काळाच्या तीव्रतेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हा सर्वात भयानक दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, तिथे प्रत्यक्षात मदत पोहोचणार का, हा प्रश्न आहे. दुष्काळाची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असताना सरकारचे (Government) नेमके नियोजन काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी म्हटले.

दुष्काळातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. काल कुणीतरी बोलले की अंमलबजावणी व्हायला अजून वेळ लागेल. आणखी किती काळ हे सांगता येणार नाही. किती जीव गेल्यानंतर या सरकारकडून अंमलबजावणी होणार? असा सवाल त्यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा ‘ट्रिगर’ शब्दाचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केले. ट्रिगर काय आहे हे? काय नाटक चाललं आहे? दुष्काळ दिसतोय. निवडणुकीत जाऊन घरोघरी जशी मदत मागता, तशी मदत करा. ट्रिगर 1, 2, 3 किती ट्रिगर? असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारले. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. ज्यांची केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही, असा दावा त्यांनी केला. कर्जमाफी प्रत्यक्षात कितपत झाली आहे, याबाबत प्रश्नचिन्ह असून सरकारच्या घोषणांवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले.

विहिरीत पाणी नाही, वीजपंपाचे शुल्क माफ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केवळ वीजपंपाचे शुल्क माफ करून उपयोग नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. विहिरीतच पाणी नसेल तर वीजपंपाचे शुल्क माफ करून शेतकऱ्यांना काय फायदा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारकडे मागणी केली. फक्त परीक्षेचे शुल्क नव्हे, तर सर्व शैक्षणिक शुल्क माफ करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

एल-निनोमुळे संकट आणखी गडद होण्याची भीती

एल-निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. परिस्थिती बिकट झाल्यास त्याचा परिणाम रोजगारावरही होऊ शकतो आणि बेरोजगारी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले. सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच तातडीने प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT